Ram Gopal Varma on Dhurandhar 2 Dawood Ibrahim: दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी यांनी ‘धुरंधर २’ चं भरभरून कौतुक केलंय. धुरंधर २ ‘शोले’ नंतरचा सर्वात उत्कृष्ट चित्रपट असल्याचं विधान त्यांनी केलं. इतकंच नाही तर आदित्य धर यांना आपला ‘नवीन गुरू’ म्हणत या चित्रपटाच्या प्रभावाची तुलना स्वतःच्या ‘सत्या’ चित्रपटाशी त्यांनी केली होती. मात्र धुरंधर चित्रपटातील दाऊद इब्राहिमचं चित्रण त्यांना पटलेलं नाही. काही दिवसांपूर्वी दाऊदमुळे आपलं घर चालतंय म्हणणाऱ्या राम गोपाल वर्मांनी धुरंधरमधील दाऊदच्या चित्रणाबद्दल काय म्हटलंय, ते जाणून घेऊयात.
धुरंधर चित्रपटात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा उल्लेख ‘बडे साहब’ असा करण्यात आला आहे आणि तो पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्कची सूत्रे हलवताना दाखवला आहे. तसेच, तो भारतात बेकायदेशीर दहशतवादी कारवाया करणारा मुख्य सूत्रधार असल्याचंही दाखवलं आहे. मात्र, राम गोपाल वर्मांनी दाऊद इब्राहिमच्या या अशा चित्रणाशी सहमत नसल्याचं विधान केलंय.
दाऊद इब्राहिमचं चित्रण चुकीच्या पद्धतीने केलंय
लेखक हुसेन झैदी यांनी राम गोपाल वर्मा यांना ‘धुरंधर’बद्दल त्यांचं मत विचारलं. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या तांत्रिक बाबींचं भरभरून कौतुक केलं. मात्र, चित्रपटात दाऊदला ज्यापद्धतीने दाखवलंय, त्याबद्दल ते सहमत नाहीत. “सिनेमातील एकाच गोष्टीशी मी सहमत नाही, ती म्हणजे… मला असं वाटतं की दाऊद इब्राहिमचे चित्रण… त्यांचे स्वतःचे काही स्रोत असू शकतात, पण मला वाटतं की ते चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलंय.”
दाऊदने २० वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली – राम गोपाल वर्मा
आपल्याकडे जी माहिती आहे, त्याच्याशी धुरंधरमधील माहिती जुळत नसल्याचं वर्मांनी सांगितलं. ते म्हणाले, “मी हे पूर्ण अधिकाराने सांगू शकत नाही, पण मला जे माहित आहे, त्याच्याशी हे जुळत नाही.” दाऊद हा आता गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय नसून ‘त्याची प्रकृती ठीक नाही’ असं तेही अनेक वर्षांपासून ऐकत आहेत. वर्मा पुढे म्हणाले, “तो स्वतःच्या इच्छेने आता सक्रिय नाही, कारण आता त्याने या सगळ्या गोष्टी करणं थांबवलं आहे. मला वाटतं की त्याने २० वर्षांपूर्वीच गुन्हेगारी कारवायांमधून निवृत्ती घेतली आहे.”
‘धुरंधर’ चित्रपटाबद्दल राम गोपाल वर्मा म्हणाले की, चित्रपटात दाऊदचं एक विशिष्ट चित्र उभं केलंय, पण कोणीही ते खरं आहे की खोटं हे सिद्ध करू शकत नाही. “या विषयावर कोणीही तज्ज्ञ असू शकत नाही आणि त्यामुळेच कोणीही खात्रीने सांगू शकत नाही हेच सत्य आहे. आपल्या सर्वांना वाटतं की ‘धुरंधर’मध्ये दाऊदबद्दल दाखवलं… पण मी ते खोटे ठरवू शकत नाही आणि दिग्दर्शक ते खरं असल्याचं सिद्ध करू शकत नाही,” असं मत वर्मांनी मांडलं.
दाऊद इब्राहिममुळे घर चालतंय – राम गोपाल वर्मा
‘फिल्मफेअर’शी बोलताना राम गोपाल वर्मांनी म्हटलं की, त्यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘गन्स अँड थाईज’ दाऊद इब्राहिमला समर्पित केलं होतं. “मी ते पुस्तक दाऊद इब्राहिमलाही समर्पित केलं होतं, पण प्रकाशकांनी त्याचं नाव हटवलं. जर दाऊद इब्राहिम नसता, तर मी ‘सत्या’ आणि ‘कंपनी’सारखे दोन अजरामर चित्रपट बनवू शकलो नसतो. मग मी त्याला हे पुस्तक कसे समर्पित करणार नाही? त्याच्यामुळेच मी आज माझं घर चालत आहे,” असं वर्मा म्हणाले.
९० च्या दशकात इतर कलाकार आणि दिग्दर्शकांप्रमाणे त्यांना कधी धमक्यांचे फोन आले का? त्यावर ते म्हणाले, “मी एकमेव असा माणूस होतो ज्याला कधीच धमक्यांचे फोन आले नाहीत, कारण त्यांना ‘सत्या’ आणि ‘कंपनी’ हे चित्रपट खूप आवडले होते. त्यांना मला त्रास द्यायचा नव्हता. मी एक प्रकारे त्यांचा ‘सोलमेट’ झालो होतो.”
‘धुरंधर २’ चे कलेक्शन
आत्तापर्यंत, ‘धुरंधर २’ ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर तब्बल १७३३.२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, राकेश बेदी, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि गौरव गेरा यांसारख्या कलाकारांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. ‘धुरंधर’च्या दोन्ही चित्रपटांनी मिळून आतापर्यंत ३,००० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे.
