बॉलीवूड दिग्दर्शक रामगोपाल वर्मा त्याच्या आगामी ‘सरकार ३’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. पण, त्याच दरम्यान त्याने पुढच्या चित्रपटाचीही घोषणा केली आहे. रामू ‘शशिकला’ असे शीर्षक असलेला चित्रपट चित्रीत करणार आहे. चित्रपटाचा विषय आणि त्याचे शीर्षक पाहता काही दिवसांपूर्वीच निधन झालेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता आणि त्यांची जवळची मैत्रिण वीके शशिकला यांच्या मैत्रीवर हा चित्रपट आधारित असण्याची शक्यता आहे. मात्र, रामगोपाल वर्माच्या म्हणण्यानुसार या चित्रपटाची कथा ही काल्पनिक आहे.

रामगोपाल वर्माने ट्विट केलेय की, ‘शशिकला’ शीर्षक असलेल्या चित्रपटाचे नुकतेच रजिस्ट्रेशन केले. ही एका राजकीय नेत्याच्या प्रिय मैत्रिणीची कथा असून हा चित्रपट पूर्णपणे काल्पनिक असेल. जयललिता यांच्याविषयी आपल्या मनात आदर असल्याचे रामगोपाल वर्माने म्हटले आहे. ६८ वर्षीय जयललिता यांना २२ सप्टेंबर रोजी ताप आल्यामुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जयललिता यांना मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे दोन महिने त्यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारांना जयललिता यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता. पण, उपचारादरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर अपोलो रुग्णालयातील ह्रदयरोग तज्ज्ञ आणि अन्य डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र ५ डिसेंबरला रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, रामगोपाल वर्माचा ‘सरकार ३’ हा चित्रपट येत असून यात अमिताभ बच्चन हे सुभाष नागरे ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. बिग बींव्यतिरिक्त या चित्रपटात मनोज वाजपेयी, जॅकी श्रॉफ आणि यामी गौतम यांच्याही मुख्य भूमिका आहेत. ‘सरकार’ सिरीजमधील पहिला भाग २००५ साली प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाला चांगली पसंतीही मिळाली होती. या चित्रपटात कतरिना कैफ आणि अभिषेक बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तर याचा दुसरा भाग २००८ साली प्रदर्शित करण्यात आला होता. यात अभिषेक बच्चनसह ऐश्वर्या राय बच्चनदेखील झळकली होती. आता रामू ‘सरकार’ सिरीजचा तिसरा भाग २०१७ साली प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे.