अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचे दिग्दर्शन, पेशवाईचा इतिहास आणि त्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा पडद्यावर पहिल्यांदाच रंगणारी ‘रमा माधवा’ची प्रेमकथा अशा उत्साहात गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी लोअर परळ येथील ‘पीव्हीआर’ सिनेमागृहात ‘रमा माधव’ चित्रपटाचा प्रीमिअर सोहळा दणक्यात पार पडला. ‘रमा माधव’च्या निमित्ताने आम्ही धाडसी प्रयोग केला आहे. माधवराव पेशवे आणि रमा यांच्या प्रेमकथेबरोबरच पेशवाईतील इतिहास व मानवी नातेसंबंध व भावभावना उलगडण्याचा हा प्रयत्न असल्याचे मृणाल कुलकर्णी यांनी सांगितले.
नानासाहेब पेशवे- गोपिकाबाई, राघोबादादा-आनंदीबाई आणि माधवराव पेशवे- रमाबाई या पेशवाईतील तीन वेगवेगळ्या नात्यांचा गोफ बांधत एका वेगळ्या तऱ्हेने रमा-माधवाची कथा सांगणाऱ्या ‘रमा माधव’  चित्रपटाचा प्रीमिअर सोहळा ‘लोकसत्ता’ने आयोजित केला होता. ‘केसरी’ प्रस्तुत, ‘अनुवेद’ प्रायोजित आणि ‘वाघाडकर ज्वेलर्स’ सहप्रायोजित या प्रीमिअर सोहळ्याला मराठी चित्रपटविश्वातील अवघे तारांगण लोटले होते. ‘रमा माधव’ चित्रपटातील कलाकार रवींद्र मंकणी, प्रसाद ओक, डॉ. अमोल कोल्हे, सोनाली कुलकर्णी, श्रुती मराठे, अलोक राजवाडे, पर्ण पेठे आणि श्रुती कार्लेकर यांच्यासह चित्रपटाचे तंत्रज्ञही यावेळी आवर्जून उपस्थित होते. या सर्वाचे दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी यांनी स्वागत केले. मराठीत गेल्या काही वर्षांत इतिहास सांगणारा चित्रपट तयार झाला नव्हता. ‘रमा माधव’च्या निमित्ताने आम्ही केलेल्या या धाडसाचे प्रेक्षकांनी स्वागत करावे. तुम्हाला हा चित्रपट नक्कीच आवडेल, असे आवाहन मृणाल कुलकर्णी यांनी उपस्थितांना केले. ‘रमा माधव’च्या प्रीमिअर सोहळ्याला मराठी चित्रपट-नाटय़ सृष्टीतील मान्यवर उपस्थित होते. यात भारती आचरेकर, मनोज जोशी, स्वप्नील जोशी, अश्विनी भावे, अशोक हांडे, प्रिया बापट, सिद्धार्थ जाधव, रवी जाधव, महेश लिमये, नितीन चंद्रकांत देसाई, आदेश बांदेकर, सचिन खेडेकर, किरण शांताराम, प्रसाद कांबळी, लिना मोगरे, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, संदीप कुलकर्णी, जितेंद्र जोशी, नानुभाई, विसुभाऊ बापट, संजय छाब्रिया, ऋषिकेश जोशी,उपेंद्र लिमये, आदिनाथ कोठारे आदींचा समावेश होता.