दूरदर्शनवरच्या ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेत सीतेची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिपीका चिखलीया यांच्या सासऱ्यांचं काल निधन झालं. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबद्दल माहिती दिली आहे.

दिपीका यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्याला कॅप्शन देताना दिपीका म्हणतात, “ते माझे सासरे होते पण त्यांनी मला कायम आपल्या मुलीसारखं वागवलं. कायम मार्गदर्शन केलं आणि चौकटीबाहेरचा विचार करायला शिकवलं. पापा, तुम्ही कायम आठवणीत राहाल, आमच्या मनात आणि प्रार्थनेत कायम राहाल.”

लॉकडाऊनच्या काळात दूरदर्शनवरची ‘रामायण’ ही मालिका पुन्हा दाखवण्यात आली. त्यामुळे दिपीका तसंच या मालिकेतले सर्व कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यांचे सासरे ८८ वर्षांचे होते. त्यांच्याबद्दल सांगणारी एक भावूक पोस्ट त्यांनी शेअर केली. या पोस्टमध्ये दिपीका यांच्या सासऱ्यांचा फोटोही आहे. त्या लिहितात, “आमची स्वप्न पूर्ण कऱण्यासाठी त्यांनी आम्हाला कायम प्रेरणा दिली आहे. जगासाठी ते दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व होतं. ते कायम काळाच्या पुढचा विचार करायचे. त्यांच्या जवळच्या माणसांसाठी तर ते आधारस्तंभ होते. त्यांच्यामुळे आयुष्यातल्या समस्यांना कसं तोंड देता येईल हे शिकता आलं.”

या पोस्टचा शेवट करताना दिपीका म्हणतात, “तुमच्यावर आमचं प्रेम कायम राहील, तुम्ही कायम आठवणीत राहाल, तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही.”

दिपीका या लवकरच भारतीय राजकारणातल्या महत्त्वाच्या नेत्या सरोजिनी नायडू यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहेत. ‘सरोजिनी’ असं या बायोपिकचं नाव असेल. याचं दिग्दर्शन आकाश नायक आणि धीरज मिश्रा यांनी केलं आहे. दिपीका यांनी आयुष्मान खुराना, यामी गौतम आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या, २०१९सालच्या ‘बाला’ या चित्रपटातही काम केलं आहे.