‘रामायण’ चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीची निवड झाल्यापासून सोशल मीडियावर याबद्दल वेगवेगळी चर्चा सुरू आहे. अनेकांनी तिच्या सौंदर्याचं आणि दमदार अभिनयाचं कौतुक केलं आहे. मात्र, काहींनी त्यांच्या मनात असलेल्या सीतेच्या प्रतिमेशी साई पल्लवी जुळत नसल्याचं मत व्यक्त केलं आहे.
अलीकडेच बॉलीवूडमधील बहुचर्चित चित्रपट ‘रामायण’चा ट्रेलर रिलीज झाला आणि अनेकांनी याबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी कौतुक केलं तर काहींनी टीका केली. यावेळी चित्रपटातील मुख्य अभिनेत्री साई पल्लवीच्या लूकबद्दलही सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. अशातच आता पू्र्वी तिने तिच्या सौंदर्याबद्दल दिलेली प्रतिक्रिया आता पुन्हा चर्चेत आली आहे. तिने सौंदर्याचे निकष, चेहऱ्यावरील मुरुम (अॅक्ने), त्वचेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन (स्किन पॉझिटिव्हिटी) आणि मनोरंजनसृष्टीतील दबाव असूनही नैसर्गिक सौंदर्याला महत्त्व देण्याचा आपला निर्णय याविषयी मोकळेपणाने भाष्य केले होते.
साई पल्लवी काय म्हणालेली?
द हिंदूला दिलेल्या मुलाखतीत पडद्यावर आणि खऱ्या आयुष्यातही मेकअपशिवाय वावरण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या साई पल्लवीने चेहऱ्यावरील मुरुम (अॅक्ने) आणि रोझेशिया या त्वचाविकारांबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं होतं. तसेच प्रेक्षकांमुळे सौंदर्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन कसा बदलला, याचाही तिने उल्लेख केला होता. आपल्या प्रवासाबद्दल बोलताना साई पल्लवी म्हणाली की, प्रेक्षकांनी तिला जशी आहे तसं स्वीकारल्यानंतर स्वतःचा स्वीकार करणं तिच्यासाठी अधिक सोपं झालं. साई पल्लवी म्हणालेली, “चेहऱ्यावर मुरुम (रोझेशिया) असूनसही मला प्रेक्षकांनी जशी आहे तसं संस्वीकारलं. तेव्हाच मला समजलं की सौंदर्याचा खरा निकष म्हणजे आत्मविश्वास.” साई पल्लवीने अनेकदा सांगितलं आहे की, समाजाने ठरवून दिलेल्या पारंपरिक सौंदर्याच्या निकषांमध्ये बसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःचं नैसर्गिक रूप आणि खरेपणा जपणं अधिक महत्त्वाचं आहे.
२ कोटी रुपयांच्या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीला दिला नकार
साई पल्लवीने वर्णभेद (कलरिझम) आणि समाजातील सौंदर्याच्या निकषांविरोधात अनेकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, २ कोटी रुपयांची फेअरनेस क्रीमची जाहिरात साई पल्लवीने नाकारली होती. अशा गोष्टींचा प्रचार केल्याने लोकांच्या आत्मविश्वासावर आणि आत्मसन्मानावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असं तिचं मत होतं.
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत तिने या निर्णयामागचं कारण स्पष्ट केलं होतं. साई पल्लवी म्हणालेली, “हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. कोणाच्या निवडीवर मी टीका करू शकत नाही. पण आपल्या काही निर्णयांचा मोठ्या प्रमाणावर लोकांवर परिणाम होत असेल, तर अशा वेळी मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडणं गरजेचं मानते. माझे अनेक मित्र आणि कुटुंबातील सदस्य आहेत, ज्यांची त्वचेच्या रंगामुळे किंवा समाजाने तयार केलेल्या सौंदर्याच्या निकषांमुळे सतत इतरांशी तुलना करण्यात आली आणि त्यांना कमीपणा जाणवला.”
साई पल्लवीने सांगितले की, चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी ती चेहऱ्यावरील मुरुमांमुळे खूप त्रस्त होती. रंग उजळावा म्हणून तिने अनेक फेअरनेस क्रीमही वापरून पाहिल्या होत्या. ती म्हणाेली, “प्रेमम चित्रपटापूर्वी मी अनेक फेअरनेस क्रीम वापरायचे. माझ्या चेहऱ्यावर खूप मुरुम होते. त्यामुळे मी स्वतःलाच खूप त्रास करून घेतला. घराबाहेर पडावंसंही वाटायचं नाही. लोक माझ्या डोळ्यांकडे नाही, तर चेहऱ्यावरील मुरुमांकडेच पाहतात आणि त्याबद्दलच बोलतात, असं मला सतत वाटायचं.”
साई पल्लवीच्या मते, ‘प्रेमम’ प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी तिला जशी आहे तसं स्वीकारलं आणि त्यामुळे स्वतःकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. तसेच अशाच प्रकारच्या असुरक्षिततेचा सामना करणाऱ्या तरुणांवर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सकारात्मक प्रभाव पडत असल्याची जाणीवही तिला झाली.
