Ramayana Part 1 Trailer Release : नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण: पार्ट १’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर अखेर ब्रह्ममुहुर्तावर पाच भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेतील या ट्रेलरने प्रदर्शित होताच इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. रणबीर कपूरची श्रीराम यांच्या भूमिकेतील एन्ट्री आणि यशचा अमर, शक्तिशाली रावण अवतार पाहून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या भव्य चित्रपटात अरुण गोविल, लारा दत्ता, रवी दुबेसह अनेक कलाकारांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.
संपूर्ण ट्रेलरमध्ये व्हीएफएक्सचा दमदार वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर ट्रेलरमध्ये दमदार संवादही ऐकायला मिळतात. सृष्टीच्या प्रारंभापासून तिन्ही लोकांचे संचालन त्रिदेव करतात. ब्रह्मा- जे सृष्टीची निर्मिती करतात, विष्णू- जे तिचे पालन करतात आणि शिव- जे परिवर्तनाचे प्रतीक आहेत. ट्रेलरची सुरुवात रावणाच्या क्रूरतेपासून होते. सगळीकडे फक्त फक्त रावणराज असेल, असा डायलॉग आहे. त्यानंतर जेव्हा स्वर्ग आणि पृथ्वीमध्ये असंतुलन वाढू लागते, तेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतार धारण करून संतुलन प्रस्थापित करतात. यावेळी भगवान विष्णू राम (रणबीर कपूर) यांच्या रूपात जन्म घेतात आणि त्यांच्या समोर उभा असतो रावण (यश). अत्यंत शक्तिशाली, विद्वान, अजिंक्य आणि अमर राक्षसराज, ज्याला त्रिदेवांचे वरदान लाभले आहे आणि ज्याचा अहंकार व सूड संपूर्ण विश्वाला संकटात टाकू शकतो.
रणबीर कपूरची प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत एंट्री होते आणि ‘विश्व कल्याणासाठी माझा अंत जरी झाला तरी चालेल’, असा दमदार संवाद ऐकायला मिळतो. त्यानंतर कैकेयीचं पूत्रप्रेम, राजा दशरथ यांनी दिलेलं वचन, राम-लक्ष्मण व सीतेचा वनवास याची झलक पाहायला मिळते. ‘मला लग्नात दिलेल्या वचनाचं काय’? असा प्रश्न सीता विचारते. आणि मग नशीबात जे लिहिलंय ते मान्य आहे असं म्हणते. नंतर वनवासाचा सीन पाहायला मिळतो. त्यानंतर रावणाची वाढती क्रूरता, शूर्पणखाचे नाक कापण्याचा प्रसंग, रावणाची बदल्याची भावना या गोष्टी पाहायला मिळतात. शूर्पणखाला भाऊ रावण म्हणतो, ‘मी रामाकडून बदला घेणार शूर्पणखा, ना रामाचा मृत्यू साधारण असेल ना त्याचा अपमान.’ त्यानंतर ‘रावण जर तिन्ही लोकांचा स्वामी असेल तर तिन्ही लोकांसमोर त्याचा वध करेन, मी माझ्या सीतेला परत आणेन,’ या संवादानंतर राम व रावण यांच्यातील संघर्ष पाहायला मिळतो.
पाहा ‘रामायण: पार्ट १’ चा ट्रेलर
दिग्गज कलाकारांची मांदियाळी
नमित मल्होत्रांच्या ‘रामायण’च्या दिग्दर्शनाची धुरा नितेश तिवारी यांनी सांभाळली आहे. चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत आहे. तर साई पल्लवी माता सीताच्या भूमिकेत असून कन्नड स्टार यश रावणाची प्रभावी भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात अरुण गोविल, ज्यांनी अनेक वर्षांपूर्वी भगवान राम यांची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते, ते या चित्रपटात राजा दशरथ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्याबरोबर लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत, अजिंक्य देव- ऋषी विश्वामित्र, कुणाल कपूर- भगवान इंद्र, रकुल प्रीत सिंह -शूर्पणखा आणि रवि दुबे लक्ष्मणच्या भूमिकेत झळकणार आहे.
‘रामायण’ चित्रपटाची पटकथा पुरस्कारविजेते लेखक श्रीधर राघवन यांनी लिहिली आहे. संगीताची धुरा ऑस्कर विजेते संगीतकार हॅन्स झिमर आणि
ए. आर. रहमान यांनी सांभाळली आहे. नमित मल्होत्रांच्या प्राइम फोकस स्टुडिओज तसेच आठ वेळा ऑस्कर विजेत्या VFX स्टुडिओ DNEG यांची निर्मिती असलेला, यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या सहकार्याने तयार झालेला ‘रामायण: पार्ट १’ दिवाळी २०२६ मध्ये जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
