Movie Release in this week : येत्या आठवड्यात सिनेमागृहांत जबरदस्त सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे सुट्यांमध्ये कुटुंबाबरोबर किंवा मित्रांबरोबर सिनेमा बघण्याचा प्लॅन करीत असाल, तर बॉक्स ऑफिसवर तुम्हाला अॅक्शन, कॉमेडी व थ्रिलर यांचा अनुभव घेता येणार आहे. शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांची जोडी पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार आहे. तसेच २६/११ च्या खटल्याचा थरारक प्रवासही पडद्यावर झळकणार आहे. उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेतील राजकुमार रावचा जबरदस्त अभिनय आणि यामी गौतमची फँटसी कॉमेडी यांमुळे मनोरंजनाचा तडका बघायला मिळणार आहे.

१. रणबाली

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘रणबाली’ हा पीरियड अ‍ॅक्शन ड्रामा आहे. राहुल सांकृत्यायन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून, दोघांची जोडी पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. इंग्रजांचे अत्याचार आणि दुष्काळामुळे सामान्य लोकांचं जगणं कठीण होतं. अशा परिस्थितीत आपल्या लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हा योद्धा इंग्रजांविरोधात उभा राहतो. पुढे तो ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणारा बंडखोर नेता बनतो. याबाबतची थरारक कथा ‘रणबाली’ सिनेमात मांडण्यात आली आहे.

Movies releasing this week October 16 Ranbali Vijay Deverakonda Rashmika Mandanna and Rajkummar Rao Prahaar poster
विजय देवरकोंडा व रश्मिका मंदाना यांचा ‘रणबाली’ सिनेमा

२. नयी नवेली

यामी गौतम, मिता वशिष्ठ, सुनीता राजवर व आदिनाथ कोठारे यांच्या भूमिका असलेला ‘नयी नवेली’ हा फँटसी कॉमेडी ड्रामा आहे. बालाजी मोहन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. मोहिनी लग्न करून मेरठमधील एका कुटुंबात सून म्हणून येते. घरात सगळंच विस्कटलेलं असताना तिचा स्वभाव आणि समजूतदारपणामुळे हळूहळू परिस्थिती बदलू लागते. मात्र, तिच्या दीराला घरात काही विचित्र घटना घडत असल्याचं जाणवतं. सगळ्यांची मनं जिंकणारी ही नवी सून खरंच सामान्य आहे की तिच्यामागे काही वेगळंच रहस्य आहे, असा कॉमेडी-फॅमिली ड्रामा असलेला हा सिनेमा असणार आहे.

यामी गौतम नयी नवेली सिनेमा

३. प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम

राजकुमार राव, वामिका गब्बी, जयदीप अहलावत, सिकंदर खेर व ललित प्रभाकर यांच्या भूमिका असलेला ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा बायोपिक आहे. अविनाश अरुण यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्य आणि कारकिर्दीवर आधारित आहे. २६/११ या गाजलेल्या खटल्यामध्ये आरोपींना शिक्षा मिळवून देण्यासाठी त्यांनी दिलेला कायदेशीर लढा आणि त्यातील आव्हानं यांवर आधारित हा सिनेमा असणार आहे.

प्रहार मुव्ही

४. क्रेझी कल्याणम

तरुण भास्कर धास्यम आणि अनुपमा परमेश्वरन यांच्या भूमिका असलेला ‘क्रेझी कल्याणम’ हा तेलुगू कौटुंबिक कॉमेडी ड्रामा आहे. भद्रप्पा गजुला यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. आपल्या मुलीचं लग्न व्हावं आणि तिनं सुखी संसार करावा, अशी एका वडिलांची इच्छा असते. मात्र, मुलीला स्वतःच्या मर्जीनं आयुष्य जगायचं असतं आणि सध्या लग्न करण्यात तिला अजिबात रस नसतो. अशा वेळी वडिलांची इच्छा आणि मुलीचा निर्णय यांच्यात काय घडतं, हे सिनेमात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाद्वारे ही कथा मांडताना कुटुंबातील नातेसंबंध आणि विचारांमधील फरक हलक्याफुलक्या पद्धतीने अधोरेखित करण्यात आले आहेत.