बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ अभिनेता रणबीर कपूरच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा ऐकायला मिळत आहेत. गेल्या वर्षी दुबईतील ‘ग्लोबल टीचर प्राइज’ या कार्यक्रमात तो पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसोबत झळकला होता. तेव्हापासूनच या दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांना उधाण आलं. माहिराला डेट करत असल्याचं वृत्त रणबीरने अनेकदा नाकारलं. पण, न्यूयार्कमधील दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा होऊ लागली. रणबीर- माहिराचा विषय पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं आणखी एक कारण म्हणजे या दोघांचे इन्स्टाग्राम पोस्ट.

रणबीरने नुकताच त्याचा ३५ वा वाढदिवस मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत साजरा केला. या पार्टीला दिग्दर्शक करण जोहरपासून, शाहरुख खान, आमिर खान, आलिया भट्ट यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. याच पार्टीमधला एक सेल्फी रणबीरने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. करण जोहरसोबत काढलेल्या या सेल्फीमध्ये रणबीरने लाल आणि काळ्या रेषांचा शर्ट घातलेला पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे असाच शर्ट घातलेला एक फोटो माहिराने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. मुलगा अझलानसोबतच्या या फोटोमध्ये माहिरानेही रणबीरसारखाच लाल आणि काळ्या रेषांचा शर्ट घातला आहे. दोघांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा असतानाच हे फोटो विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

दरम्यान, न्यूयॉर्कमधील रणबीरसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी माहिरावर टीकेची झोड उठवली होती. यामुळे तणावाखाली येऊन तिची तब्येत बिघडल्याचं म्हटलं जात होतं. या सर्व प्रकारानंतर अभिनेता रणबीर कपूरने माहिराची पाठराखण करत उघडपणे त्याचं मत मांडलं होतं. ‘गेल्या काही महिन्यांपासून मी माहिराला अगदी चांगलं ओळखू लागलो आहे. एक व्यक्ती म्हणून आणि तिने मिळवलेल्या यशाबद्दलही मला तिचा आदर वाटतो. सध्याच्या घडीला तिच्याविषयी केली जाणारी वक्तव्ये साफ चुकीची आहेत. एक महिला म्हणून ज्या भेदभावाच्या उद्देशाने तिची पारख केली जात आहे, ते चुकीचं आहे’, असं म्हणत तिच्याविषयीच्या नकारात्मक चर्चा थांबवण्याची विनंती त्याने केली होती.