scorecardresearch

.. तर कंगनाने सुगंधाला मारलेच असते

सुगंधाला तेव्हा अवघडल्यासारखे झाले होते.

.. तर कंगनाने सुगंधाला मारलेच असते
'रंगून'च्या प्रसिद्धीसाठी नुकतीच कंगनाने सुगंधा मिश्रा सूत्रसंचालक असलेल्या 'द वॉइस ऑफ इंडिया किड्स' या रिअॅलिटी शोच्या सेटवर उपस्थिती लावली होती.

बॉलीवूडची क्वीन कंगना रणौत सध्या तिच्या आगामी ‘रंगून’ या चित्रपटाची प्रसिद्धी फार जोरात करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांच्याही भूमिका आहेत. पण, ‘रंगून’च्या प्रसिद्धीसाठी कंगना कोणतीही कसर बाकी ठेवत नसल्याचे सध्या चित्र असून, त्याकरिता ती विविध रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावत आहे. ‘रंगून’च्या प्रसिद्धीसाठी नुकतीच कंगनाने सुगंधा मिश्रा सूत्रसंचालक असलेल्या ‘द वॉइस ऑफ इंडिया किड्स’ या रिअॅलिटी शोच्या सेटवर उपस्थिती लावली होती. यावेळी तिच्यासोबत चित्रपटातील अभिनेता शाहिद कपूर हा देखील उपस्थित होता.

‘द वॉइस ऑफ इंडिया किड्स’च्या गाला टाइममध्ये शाहिद आणि कंगनाने खास पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. त्यांनी यावेळी शोमधील मुलांसोबत मजा-मस्तीदेखील केली. त्याचवेळी शोची सूत्रसंचालक सुगंधा मिश्रा हिच्याकडून ‘क्वीन’ चित्रपटातील अभिनेत्रीच्या बाबतीत एक चूक झाली. ‘द वॉइस ऑफ इंडिया किड्स’ या शोचे परिक्षक असलेल्या सलीम मर्चंट आणि शान यांनी कंगनासमोर तिची नकल करून दाखवण्याचे आव्हान सुगंधा दिले. त्यावेळी शान आणि सलीमने दिलेले आव्हान स्वीकारत सुगंधाने कंगनाची नकल करण्यास सुरुवात केली. आयएएनएसने दिलेल्या सूत्रांनुसार, सुगंधाने केलेली नकल कंगनाला काही आवडली नाही आणि तिने रागात ‘मला हिच्या कानशिलात लगावण्याची इच्छा आहे,’ असे म्हटले. पण, शोची सूत्रसंचालक असल्यामुळे सुगंधाने तिचे म्हणणे जास्त मनावर न घेता कार्यक्रम पुढे तसाच चालू ठेवला. सेटवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगनाच्या या वक्तव्यानंतर  सेटवर उपस्थित असलेले सर्व लोक चकित झाले होते. सुगंधाला तेव्हा अवघडल्यासारखे झाले होते. तिच्यासाठी हा विचित्र क्षण होता. पण, तिने हे खिलाडी वृत्तीने घेत कार्यक्रम पुढे चालू ठेवला.

काही दिवसांपूर्वीच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अभिनेता शाहरुख खानने उपस्थिती लावली होती. त्यावेळी शाहरुखने सुगंधाला ती वाईट कलाकार असून तिने नृत्य करणे टाळले पाहिजे असे म्हटले होते. त्यामुळे तेव्हा सुगंधाच्या डोळ्यात अश्रू आले होते. पण, त्यानंतर शाहरुखने तिच्या चेह-यावर हसूही आणले. आपण जे काही बोललो तो केवळ एक प्रॅन्क होता. मात्र, कंगनाच्या वेळी जे काही घडले तो प्रॅन्क होता असे वाटत नाही.

दरम्यान, नुकतेच कंगनाने आपल्या रिलेशनशीपबद्दल खुलेपणाने भाष्य केले. सिनेसमिक्षक अनुपमा चोप्रा यांच्याशी केलेल्या बातचीतमध्ये कंगना म्हणाली की, सुरुवातीच्या २० वर्षांमध्ये, लोक लग्न का करतात असा प्रश्न आपल्याला पडतो. पण २० वर्षांनंतर आपले विचार बदलायला लागतात. आपण एका वेगळ्या नजरेने गोष्टी पाहायला लागतो. आपली काळजी घेईल असा एखादा साथिदार असावा असे प्रत्येकालाच वाटते. कंगना पुढे म्हणाली की, आता नाती सांभाळायला मी पूर्णपणे तयार झाले आहे. लग्नाच्याच बाबतीत ती पुढे म्हणाली की, लग्नानंतर तिला बायको नवऱ्याचे नाते पूर्णपणे निभावयाचे आहे. पण, यासाठी समोरच्यानेही याच दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. कंगना म्हणाली की, तिला तिचे खरे प्रेम मिळाले आहे. तिचे त्या व्यक्तीवर फार प्रेम आहे. या रिलेशनशिपमध्ये ती फक्त डेट करायचेच असे न बघता तिला त्या व्यक्तीसोबत लग्नही करायचे आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-02-2017 at 15:41 IST