तीन दशकांहून अधिक काळ मध्यवर्ती आणि दमदार व्यक्तिरेखांच्या माध्यमातून बॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा तिच्या लोकप्रिय ठरलेल्या शिवानी शिवाजी रॉय या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे. बॉलीवूडमध्ये तीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नुकतंच यशराज स्टुडिओत केलेला आनंद सोहळा आणि ‘मर्दानी ३’ या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना आजवरच्या भूमिका आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांच्याबद्दलच्या आठवणी यासंदर्भात मनमोकळ्या गप्पा मारल्या.
‘मर्दानी’ चित्रपटाची कथाकल्पना ही निर्भया घटनेनंतर आकाराला आली. निर्भयानंतर लोकांच्या मनात राग धुमसत होता. कुठे तरी स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाची-शोषणाची वास्तव गोष्ट चित्रपटातून समाजासमोर यावी, हा उद्देश त्यामागे होता. पण खऱ्या अर्थाने या चित्रपट शृंखलेचं श्रेय मी चित्रपटाचे कथा-पटकथालेखक गोपी पुथरन, पहिल्या ‘मर्दानी’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप सरकार आणि आत्तापर्यंत या चित्रपटांचा प्रवास ज्यांच्यामुळे शक्य झाला ते निर्माता आदित्य चोप्रा यांना देईन. हे सगळे या चित्रपटाचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांनी हा विषय आणि हे पात्र माझ्यापर्यंत आणलंच नसतं, तर इतक्या सुंदर कलाकृती करणं मला शक्य झालं नसतं’, अशी भावना राणी मुखर्जीने व्यक्त केली.
या तिन्ही चित्रपटांचे विषय हे वास्तवावर आधारित आहे, असंही तिने सांगितलं. ‘मर्दानी’ या पहिल्या चित्रपटापासून आत्ताच्या तिसऱ्या सिक्वेलपर्यंत सगळे कथाविषय हे आजूबाजूला घडणाऱ्या वास्तव घटनांवर आधारित आहेत. पहिल्याच चित्रपटात मुलींना पळवून नेऊन मानवी तस्करी करणाऱ्यांवर प्रकाश टाकण्यात आला होता. दुसऱ्या चित्रपटात स्त्रियांवर बलात्कार करून त्यांना ठार मारणाऱ्या विकृत माणसाची कथा होती. आणि आता या तिसऱ्या चित्रपटातही मुलींचं अपहरण करून त्यांचं शोषण करणाऱ्यांचं वास्तव मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हे सगळं आजच्या समाजाचं वास्तव आहे, आपल्या आजूबाजूला अशा शोषणाच्या घटना सातत्याने घडत आहेत, त्याविषयी लहान मुलांना, पालकांना आणि एकूणच समाजाला जागृत करण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रामाणिकपणे ते विषय ‘मर्दानी’तून मांडण्यात आले’, असं राणीने सांगितलं. ‘कलाकार म्हणून हे चित्रपट करणं माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत थकवणारं होतं. मी स्वत: एक स्त्री आहे, आई आहे. आजूबाजूच्या लोकांना काय प्रकारच्या संकटातून जावं लागतं आहे, या विचाराने माझ्याही मनाचा थरकाप उडतो. आणि म्हणून नेहमी वावरताना अत्यंत सतर्क असणं खूप गरजेचं आहे. किमान ही जाणीव तरी या चित्रपटातून निर्माण होईल’, असं आपल्याला वाटत असल्याचंही तिने स्पष्ट केलं.
अर्थात, या घटना किंवा त्यांची भीती ही या चित्रपटापुरती मर्यादित नाही, हेही ती पुन:पुन्हा सांगते. अशा प्रकारे स्त्रिया, लहान मुलं-मुली यांचं शोषण करणाऱ्या घटना रोज घडतात आणि आपण या वास्तवाकडे डोळेझाक करू शकत नाही. त्यामुळे चित्रपट वा अन्य कलाकृतींमधून सातत्याने या घटनांबद्दल बोललं गेलं पाहिजे. गंभीर गुन्हे करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे कायदे असायला हवेत आणि त्याची अंमलबजावणीही तितक्याच काटेकोरपणे व्हायला हवी, तर कदाचित त्याचे चांगले परिणाम आपल्याला भविष्यात दिसतील. मात्र, त्यासाठी या घटनांवर एकत्र येऊन सातत्याने बोलणं, व्यवस्थेसमोर हे विषय मांडणं, उपाययोजनांविषयी एकत्रित चर्चा होणं गरजेचं असल्याचं मतही तिने व्यक्त केलं.
‘हिंदी चित्रपटसृष्टीत मला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही नवीन चित्रपट आला की पहिला चित्रपट असावा, अशाच पद्धतीचं दडपण मला येतं. माझा चित्रपट, भूमिका प्रेक्षकांना आवडेल की नाही, या विचाराने अजूनही पोटात गोळा येतो. त्यामुळे कितीही वर्ष काम करण्याचा अनुभव असला तरी प्रत्येक नव्या चित्रपटाबरोबर होणारा प्रवास, प्रदर्शनाविषयीची उत्सुकता हेच सगळं कलाकार म्हणून मला पुढे नेत राहतं’, असं राणीने सांगितलं. हिंदी चित्रपटसृष्टीत तिने प्रवेश केला तेव्हा खरंतर नायकांची सद्दी होती. त्या वेळी व्यावसायिक चित्रपटांमधूनही सतत दमदार व्यक्तिरेखांमधूनच प्रेक्षकांसमोर येण्याचं कसब कसं साधलं, याबद्दल बोलताना मुळात माझ्या वाट्याला येणाऱ्या व्यक्तिरेखेला तिचं काही म्हणणंच नसेल, तिचं स्वत:चा असा काही लेखाजोखाच नसेल, तिच्याकडून दुसऱ्या स्त्रीला प्रेरणा मिळणार नसेल तर ते करण्यात मला रसच वाटत नाही.
कौटुंबिक कथा असो, प्रेमकथा असो किंवा कुठलाही विषय असला तरी भारतीय स्त्री ही पूर्वीपासूनच स्वतंत्र बाण्याची, विचारांची आणि स्वत:च्या पद्धतीने जगणारी आहे. आणि हे कुठे तरी वैश्विक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणंही गरजेचं होतं. त्यामुळे तशा दमदार व्यक्तिरेखा असल्याशिवाय मी चित्रपट केले नाहीत. म्हणूनच माझी प्रत्येक भूमिका, चित्रपट प्रेक्षकांना लक्षात राहिले असावेत, असं तिने सांगितलं.
‘युवा’मधली शशी, ‘हम तुम’ची रिया, ‘साथिया’मधली सुहानी, ‘चलते चलते’ची प्रिया, ‘बंटी और बबली’मधली विम्मी, ‘हिचकी’मधली नैना माथूर, ‘मर्दानी’ची शिवानी शिवाजी रॉय, ‘वीर झारा’ची माया सिद्दिकी… तिच्या प्रत्येक चित्रपटातली व्यक्तिरेखांची नावं तिच्या तोंडावर आहेत. ‘माझी प्रत्येक भूमिका खूप खास आहे, महत्त्वाची आहे, त्या पाहिल्यानंतर समोरची स्त्री काही ना काही तरी प्रेरणा घेणार, याची मला खात्री आहे’, असं ती विश्वासाने सांगते. नव्या पिढीतले लेखक-दिग्दर्शक माझ्यासाठी काय विचार करतात? कुठल्या प्रकारच्या भूमिकेचं आव्हान ते माझ्यासमोर आणणार? याविषयी माझ्या मनात खूप उत्सुकता असते, असंही ती सांगते. कलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर तुमच्या नावावर, तुमच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट यशस्वी करून दाखवण्यातलं आव्हान, त्यातली मजा काही औरच आहे. पण, ओटीटीसारख्या आजच्या नव्या माध्यमामुळे खूप गुणी कलाकार, नवे लेखक – दिग्दर्शकांना मोठी संधी मिळाली आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्या माध्यमाचंही आपलं एक महत्त्व आहे, असं निरीक्षणही राणीने नोंदवलं.
यानिमित्ताने निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांच्याबद्दलच्या आठवणीही तिने सांगितल्या. ‘चित्रपटसृष्टीत आले तेव्हा निर्माते म्हणून माझी यश चोप्रांबरोबर ओळख झाली. माझ्या त्यांच्याबरोबर तेव्हा झालेल्या चर्चा खूप काही शिकवणाऱ्या होत्या. नंतर ते सासरे म्हणून माझ्या आयुष्यात आले. त्यांचं आनंदी व्यक्तिमत्त्व, इतके मोठे दिग्दर्शक असूनही अत्यंत साधी राहणी, आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन फार निरागस आणि निर्मळ होता. ते स्वत: खाण्याचे खूप शौकीन होते आणि तितक्याच आवडीने ते इतरांना खिलवायचे. माझी मुलगी, त्यांची नात अदिरा त्यांना भेटू शकली नाही, याची खूप खंत वाटते. पण, आम्ही सतत तिला आजोबांविषयी सांगतो जेणेकरून तिलाही त्यांच्या कर्तृत्वाविषयी माहिती होईल’, अशी आठवणही राणी मुखर्जीने सांगितली.

