Ranveer Allahbadia Post on Pakistan: प्रसिद्ध यूट्यूबर व पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया त्याने पाकिस्तानसंदर्भात केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादामुळे चर्चेत राहिल्या रणवीरने पाकिस्तानी लोकांची माफी मागितली आहे. त्याची पोस्ट पाहता तो पुन्हा एकदा वादात अडकेल, असं दिसत आहे.

रणवीरने भारत-पाकिस्तान तणावादरम्यान सोशल मीडियावर पोस्ट केली, ज्यामुळे लोक भडकले आहेत. रणवीरने फक्त पाकिस्तानी लोकांची माफीच मागितली नाही तर त्याच्या या पोस्टमुळे भारतीय लोक नाराजही होतील, असं म्हटलं आहे.

रणवीरने पाकिस्तानी लोकांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. मनात पाकिस्तानी लोकांबद्दल कोणताही द्वेष नाही, असं रणवीरने म्हटलं आहे. त्याची ही पोस्ट व्हायरल झाल्यावर लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली, मग त्याने ती पोस्ट डिलीट केली, पण आता त्याच्या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणवीरने पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं होतं, ते जाणून घेऊयात.

पाकिस्तानी लोकांसाठी मनात द्वेष नाही – रणवीर अलाहाबादिया

रणवीरने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर केली. ज्यात त्याने पाकिस्तानी लोकांबद्दल मनात द्वेष नसल्याचं लिहिलंय. “प्रिय पाकिस्तानी बंधू आणि भगिनींनो, यासाठी अनेक भारतीय माझा द्वेष करतील, पण हे बोलणं गरजेचं आहे. इतर अनेक भारतीयांप्रमाणे, माझ्या मनातही तुमच्याबद्दल द्वेष नाही. आपल्यापैकी अनेक लोकांना शांती हवी आहे. जेव्हा जेव्हा आम्ही पाकिस्तानी लोकांना भेटतो तेव्हा तुम्ही नेहमीच प्रेमाने आमचे स्वागत करता,” असं रणवीर म्हणाला.

पुढे रणवीरने लिहिलं, “पण तुमचा देश तुमचे सरकार चालवत नाही. तुमचे सैन्य आणि सिक्रेट सर्व्हिस (ISI) चालवतात. काही पाकिस्तानी लोक या दोन्हीपेक्षा खूप वेगळे आहेत. या पाकिस्तानींच्या मनात शांती आणि समृद्धीची स्वप्ने आहेत. स्वातंत्र्यानंतर या दोन खलनायकांनी तुमच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान केले आहे. भारतात सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांसाठी ते जबाबदार आहेत.”

ranveer allahbadia post on pakistan
रणवीर अलाहाबादियाच्या पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

रणवीरला पाकिस्तानी लोकांची वाटतेय काळजी

रणवीर अलाहाबादिया म्हणाला, “पाकिस्तान दहशतवादात कसा सहभागी आहे याचा पुरावा १: गेल्या काही वर्षांत पकडलेले सर्व दहशतवादी मूळचे पाकिस्तानचे आहेत. पुरावा २: जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखाचा भाऊ हाफिज अब्दुल रौफच्या अंत्यसंस्कारात तुमचे लष्करी नेते सहभागी झाले होते. पुरावा ३: तुमचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच स्काय न्यूजवर दहशतवादाची कबुली दिली, पण मला तुमची काळजी आहे, त्यांची नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणवीरने पाकिस्तानी लोकांची मागितली माफी

रणवीरने त्याच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, “आम्ही द्वेष पसरवत आहोत असं वाटत असेल तर मनापासून माफी मागतो. पाकिस्तानी लोकांना भेटणाऱ्या भारतीयांना तुमचं म्हणणं समजतंय. बहुतांशी लोकांना सीमेजवळ राहणाऱ्या निष्पाप लोकांसाठी शांतता हवी आहे. मात्र, भारत पाकिस्तानी सैन्याला आणि आयएसआयचा पुरस्कृत दहशतवाद संपवायचा आहे.”