हैदराबादमध्ये घडलेल्या घटनेचा निकाल जलद लागणे अपेक्षित होते. आरोपीला वर्षांनुवर्षे कारागृहात ठेवून आत्तापर्यंत काहीही साध्य झालेले नाही. त्यामुळे अशा एनकाऊंटरच्या माध्यमातून आरोपींच्या मनात कायद्याबाबत भीती निर्माण होईल. अशी शिक्षा कायद्याच्या चौकटीत बसवून व्हावी. गरज भासल्यास वेगवान कायद्यासाठी कायद्यात बदल करावे, अशी भावना अभिनेत्री व नाटय़कलावंत विशाखा सुभेदार हिने व्यक्त केली.

नवरंग क्रियेशनतर्फे रविवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात होणाऱ्या ‘याचं करायचं काय’ या नाटय़प्रयोगासाठी पॅडी (पांडूरंग) कांबळे, समीर चौघुले, आणि विशाखा सुभेदार शहरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. निर्भया प्रकरणानंतरच अशा घटनांसाठी कठोर कायदे करण्याची मागणी देशवासीयांनी केली होती. मात्र त्याचे काहीच झाले नाही. असामाजिक तत्वांना कायद्याची भीतीच उरली नसल्याचे जाणवत आहे, असे मत समीर चौघुले यांनी व्यक्त केले.

अशा घटनांमध्ये मुलींच्या कपडयांना दोष देणारी मंडळी आहेत. मात्र  मुलींनी कोणते कपडे घालावे याचे संविधानाने स्वातंत्र्य दिले आहे. पुरुषांची मानसिकता सुधारण्याची गरज पांडूरंग  कांबळे याने व्यक्त केली.