‘गेल्या दहा वर्षांत लेखकांनी सिनेमा बदलला’

‘‘तुम्ही ज्या विषयाला समोर ठेवून कथा लिहीत आहात त्याविषयी तुम्हाला परिपूर्ण माहिती असणं गरजेचं असतं.

तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेला ‘रश्मी रॉकेट’ हा चित्रपट क्रीडानाट्यपट असूनही तो वेगळा ठरला. गेल्या काही वर्षांत अनेक खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट आले, काही काल्पनिक कथेवर आधारित क्रीडापटही होते. ‘रश्मी रॉकेट’ क्रीडापटांच्या लाटेतही त्याच्या कथेमुळे वेगळा ठरला. सिनेमाची कथा जास्त बोलकी असते, कथेवर मेहनत घेतली आणि त्याला योग्य न्याय दिला तरच चांगला चित्रपट प्रेक्षकांसमोर येऊ शकतो, असं ‘रश्मी रॉके ट’चे पटकथाकार अनिरुद्ध गुहा सांगतात. पत्रकारिता, चित्रपट समीक्षक अशा विविध भूमिकांमधून वावरल्यानंतर अनिरुद्ध गुहा यांनी पाच वर्षांपूर्वी पटकथा लेखनाला सुरुवात के ली. सशक्त कथाच चित्रपटाला चांगलं यश मिळवून देतात, त्यामुळे लेखकांसाठी हा सुवर्णकाळ आहे, असं गुहा विश्वासाने सांगतात.

याआधी ‘मलंग’ हा चित्रपट आणि ‘युद्ध के बंदी’सारख्या मालिकांसाठी पटकथा लेखन केलेल्या अनिरुद्ध गुहा यांच्यासाठी ‘रश्मी रॉके ट’ हा चित्रपट खऱ्या अर्थाने महत्त्वाचा ठरला, असं ते सांगतात. या चित्रपटाची कथा माझी नव्हती, चित्रपटाचा दिग्दर्शक आकर्ष खुराणा याने मला कथा ऐकवली आणि त्यावर पटकथा लिहायला सांगितली. आकर्ष जेव्हा मला कथेविषयी सांगत होता, त्या वेळी त्यातला लिंग चाचणीचा मुद्दा मला महत्त्वाचा वाटला. खेळाडूंची लिंग चाचणी के ली जाते, याची मला माहिती होती. मात्र या चाचणीमुळे त्यांच्या स्त्री-पुरुष ओळखीवरच प्रश्नचिन्ह उमटतं. त्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला जातो. अनेक खेळाडूंची उमेदीची कारकीर्द या चाचण्यांमुळे मोडीत निघाली. या सगळ्याबद्दल मी वाचलं होतं. मला खूप माहिती होती. मात्र हा खूप महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून आपण त्यावर प्रकाश टाकायला हवा, हे माझ्या मनात ठाम झालं आणि मी आकर्षकडून वेळ मागून घेतला, असं त्यांनी सांगितलं.

‘‘तुम्ही ज्या विषयाला समोर ठेवून कथा लिहीत आहात त्याविषयी तुम्हाला परिपूर्ण माहिती असणं गरजेचं असतं. ‘रश्मी रॉके ट’ लिहितानाही मला लिंग चाचणीबद्दल फक्त ऐकीव माहिती असून भागणार नव्हतं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे मी माझं संशोधन सुरू के लं,’’ असं त्यांनी सांगितलं. पत्रकारितेचा अनुभव असल्याने तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती असते. कुठे तरी वाचलेली-ऐकलेली माहिती असते. मात्र प्रत्यक्ष अभ्यासातून त्याबद्दल सगळं माहिती करून घेणं जास्त गरजेचं असतं. लिंग चाचणीमागचे शास्त्रीय आधार, कसोट्या यांच्याबद्दलची माहिती मी पहिल्यांदा संशोधनातून गोळा के ली. त्यानंतर याच मुद्द्यावर खटला उभा राहिला असं कथानक असल्याने न्यायालयीन कार्यप्रणाली समजून घेण्याबरोबरच लिंग चाचणीचा विषय तिथे कशा पद्धतीने मांडला गेला याचाही आपण अभ्यास केला होता, असं ते सांगतात. चित्रपटातील कथेच्या अनुषंगाने येणारे कु ठलेही मुद्दे हे अभ्यासपूर्णच असले पाहिजेत यावर माझा भर होता, असं सांगणाऱ्या अनिरुद्ध यांनी कथा तेवढीच मनोरंजकतेने लिहिण्याची जबाबदारीही लेखकावर असते हे मान्य के लं. ‘रश्मी रॉके ट’च नव्हे तर कुठलाही चित्रपट असो, लेखकाला आपल्या कथेवर विश्वास असला पाहिजे, दुसरं म्हणजे त्या कथेचे तपशील अचूक असले पाहिजेत आणि सामाजिक संदेश किंवा मुद्दा मांडतानाच कथा रंजकतेनेही लिहिली गेली पाहिजे याचं भान लेखकाला ठेवावं लागतं, असं ते सांगतात. फरहान अख्तरने जेव्हा ‘दिल चाहता है’ चित्रपट के ला, तेव्हा मुळात तो विषय त्याला स्वत:ला माहिती होता. तरुणाईची ती मानसिकता त्याला चांगली माहिती असल्यानेच ती कथा त्याने लोकांसमोर आणली, असं ते उदाहरणादाखल सांगतात.

गेल्या दहा वर्षांत आलेल्या लेखकांनी चित्रपटात बदल घडवून आणले आहेत, असं ते ठामपणे सांगतात. जुही चतुर्वेदी, शकुन बात्रा यांसारख्या मंडळींनी ज्या पद्धतीने कथा लिहिल्या, या पिढीचे विषय कथेतून मांडले, त्यामुळे चित्रपटाच्या साचेबद्ध चौकटी मोडून पडल्या, असं ते म्हणतात. सध्याचे निर्माते-दिग्दर्शक लेखकांना खूप महत्त्व देत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘मी स्वत: सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या निर्मिती संस्थेबरोबर काम करतो आहे. पटकथा लेखनापासून प्रत्येक टप्प्यावर निर्माते-दिग्दर्शक मंडळींचा सहभाग असतो. धर्माबरोबर मी काम के लं नसलं तरी त्यांच्या कथानिवडीपासूनच्या प्रक्रियेची माहिती आहे. सध्या यशस्वी चित्रपट देणाऱ्या मडॉक फिल्म्सच्या बाबतीतही हे ठळकपणे जाणवतं. जे निर्माते आणि दिग्दर्शक लेखकांना आणि वेगवेगळ्या धाटणीच्या कथांना महत्त्व देतात त्यांचे चित्रपट यशस्वी ठरणारच,’’ असा विश्वासही अनिरुद्ध व्यक्त करतात. लेखकांनी घडवून आणलेला बदल अभ्यासायचा असेल तर २०१० मधले सर्वोत्तम दहा चित्रपट आणि २०२० मधले सर्वोत्तम दहा चित्रपट काढून पाहा. तुम्हाला फरक लगेच लक्षात येईल. हे फक्त निर्मात्यांपुरतंच नाही तर खुद्द कलाकारांनाही आपल्याला चांगल्या कथेची गरज आहे याची जाणीव आहे, असं ते म्हणतात. एखाद्या कलाकाराच्या नावावर चित्रपट चालण्याचा काळ कधीच मागे पडला आहे. आता तुमची कथा किती नवीन आहे, तुमच्याकडे कथेतून सांगण्यासारखं काय आहे, हे महत्त्वाचं ठरतं आणि याची कलाकारांनाही पूर्ण जाणीव असल्याने तेही नवनव्या लेखकांच्या आणि कथांच्या शोधात असतात, असं अनिरुद्ध यांनी सांगितलं.

अनिरुद्ध यांचे आजोबा दुलाल गुहा हे चित्रपट दिग्दर्शक होते. धर्मेंद्र यांची पडद्यावरची गरम धरम प्रतिमा मोठी करण्यात दुलाल गुहा यांचा वाटा होता, असं म्हटलं जातं. माझ्या आजोबांचे ‘प्रतिज्ञा’, ‘दो दुश्मन’ असे किती तरी चित्रपट चालले. मात्र मी मोठा होईपर्यंत आमच्या घरातलं हे चित्रपटाचं वातावरण नाहीसं झालं होतं. आम्ही अगदी मध्यमवर्गीय वातावरणातच लहानाचे मोठे झालो. त्यातल्या त्यात आजोबांकडून चित्रपटाविषयीच्या गोष्टी ऐकायचं भाग्य मात्र लाभलं होतं, अशी आठवण ते सांगतात. आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टींना मग प्रत्यक्ष त्यांचे चित्रपट पाहून अभ्यासाची जोड मी दिली. त्या वेळी मी बिमल रॉय, गुरू दत्त, देव आनंद यांचे चित्रपट पाहिले आणि माझ्या लक्षात आलं की, त्यांच्या चित्रपटात काही ना काही संदेश देण्याचा प्रयत्न के लेला असायचा. मनोरंजन तर होतंच, मात्र सामाजिक, कौटुंबिक विषयाबद्दल ठोस विचार मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटकर्मींनी केला होता. लेखक म्हणून मलाही मनोरंजनाबरोबरच काही सांगू पाहणाऱ्या सर्वसमावेशक किं वा समतोल साधणाऱ्या अशा कथा लिहायच्या आहेत, असा मानसही त्यांनी बोलून दाखवला. टाळेबंदीतला बराचसा त्यांचा काळ हा वेबमालिका आणि शोज लिहिण्यात गेला आहे. हळूहळू येत्या तीन-चार महिन्यांत त्यांचे लेखन असलेले हे चार शोज प्रेक्षकांसमोर येणार आहेत. एका वेबमालिकेसाठी लिहायचे तर ४ ते ६ महिन्यांचा वेळ द्यावा लागतो. टाळेबंदीत ते के लं. आता मात्र चित्रपट लेखनावरच भर देणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

सशक्त कथाच चित्रपटाला चांगलं यश मिळवून देतात, त्यामुळे लेखकांसाठी हा सुवर्णकाळ आहे. गेल्या दहा वर्षांत आलेल्या लेखकांनी चित्रपटात बदल घडवून आणले आहेत. सध्याचे निर्माते-दिग्दर्शक लेखकांना खूप महत्त्व देतात.  जे निर्माते आणि दिग्दर्शक लेखकांना आणि वेगवेगळ्या धाटणीच्या कथांना महत्त्व देतात त्यांचे चित्रपट यशस्वी ठरणारच. लेखकांनी घडवून आणलेला बदल अभ्यासायचा असेल तर २०१० मधले सर्वोत्तम दहा चित्रपट आणि २०२० मधले सर्वोत्तम दहा चित्रपट काढून पाहा. तुम्हाला फरक लगेच लक्षात येईल. हे फक्त निर्मात्यांपुरतंच नाही तर खुद्द कलाकारांनाही आपल्याला चांगल्या कथेची गरज आहे याची जाणीव आहे.

अनिरुद्ध गुहा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rashmi rocket sports writers have changed cinema in the last ten years taapsee pannu akp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या