Rashmika Mandanna & Vijay Deverakonda Video : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा गेल्या महिन्यात उदयपूरमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. सोशल मीडियावर अजूनही त्यांच्याच फोटोंची चर्चा आहे. दोघांच्या लग्नानंतर एका चिमुकल्या चाहतीने त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. “मला लग्नाला का बोलावले नाही?” असं म्हणत चाहतीने एक व्हिडीओ शेअर केला होता. अशातच आता चिमुकल्या चाहतीला रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने खास आमंत्रण देत पाहुणचार केला आहे.
‘युअर्स लकी थल्ली’ (Urs Lucky Thalli) या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या एका लहान मुलीने व्हिडीओ शेअर करत दोघांच्या लग्नाला जायचे असल्याची इच्छा व्यक्त केली होती. तिची ही निरागस इच्छा पाहून विजय-रश्मिकाने तिला तिच्या कुटुंबासह हैदराबादमधील घरी आमंत्रण दिले आणि तिचे आदरातिथ्य केले. याचा व्हिडीओ चिमुकल्या चाहतीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे
रश्मिका अन् विजयने केला खास पाहुणचार
या व्हिडीओमध्ये अभिनेता विजय चिमुकल्या चाहतीला उचलून घेताना दिसतोय, पुढे ती मजेत विचारते की “लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत तिचे नाव का नव्हते?” यावर रश्मिका-विजय फक्त हसून प्रतिक्रिया देतात. मग व्हिडीओमध्ये पुढे रश्मिका तिच्या ताटात लाडू वाढताना आणि प्रेमाने तिच्या गालावर किस करताना दिसते. तर विजयही तिला स्वत:च्या हातांनी भात वाढतो. पुढे ती मुलगी विचारते, “आपण पण मित्र आहोत ना?”, ज्यावर रश्मिका-विजय हसून प्रतिसाद देतात. शेवटी ती चिमुकली रश्मिका-विजय या दोघांबरोबर वेळ घालवून खूप आनंद झाल्याचे सांगते.
हा व्हिडीओ शेअर करत चिमुकल्या चाहतीने तिच्या आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत. “विजय देवरकोंडा यांना त्यांच्या घरी भेटणे हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव होता. दोघांनी आमचे खूप प्रेमाने आणि आपुलकीने स्वागत केले. रश्मिका मंदानाला भेटूनही खूप आनंद झाला. तिच्या हसऱ्या अन् मनमिळावू स्वभावामुळे ही भेट खूपच खास झाली. आम्ही खूप गप्पा मारल्या, मनसोक्त हसलो आणि असे काही आनंदाचे क्षण अनुभवले जे आयुष्यभर आमच्या लक्षात राहतील. थोडक्यात सांगायचं तर, पूर्ण दिवस आमच्यासाठी खूप खास होता. इतके मोठे स्टार असूनही अत्यंत साधे आणि नम्र असणाऱ्या या माणसांना भेटून आमचं मन भरून आलं. हा खास दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही”, असं म्हणत तिने तिचा आनंद व्यक्त केला आहे.
Urs Lucky Thalli ने शेअर केलेला व्हिडीओ
दरम्यान, ‘युअर्स लकी थल्ली’ने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला जवळपास ३० लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी रश्मिका-विजयच्या साधेपणाचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.
