Rashmika Mandanna Upcoming Six Films List : रश्मिका मंदाना सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासह २६ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. तेव्हापासून दोघेही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.रश्मिका मंदाना मनोरंजन विश्वातील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांचा प्रवास आधी प्रादेशिक चित्रपटांपासून सुरू झाला. परंतु, नंतर त्या देशभरात त्यांच्या कामामुळे लोकप्रिय झाल्या. दाक्षिणात्य चित्रपटात काम केल्यानंतर रश्मिकाने हिंदी चित्रपटांमध्येही मुख्य नायिकेच्या भूमिका साकारल्या. अभिनेत्रीने आतापर्यंत चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय अभिनेत्यांबरोबर काम केले आहे.

रश्मिकाने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. येत्या काळातही अभिनेत्री मोठ्या ६ बिग बजेट फिल्म्समधून झळकणार आहे. या आगामी सहा चित्रपटांतून रश्मिका मंदाना बॉक्स ऑफिसवर राज्य करेल, असे म्हटले जात आहे. आलिया भट्ट व दीपिका पादुकोण यांसारख्या बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपेक्षाही रश्मिकाकडे सध्या अधिक बिग बजेट फिल्म्स आहेत. रश्मिकाकडे असलेले आगामी सहा चित्रपट कोणते आहेत, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

रश्मिका मंदानाचे ६ आगामी बिग बजेट चित्रपट

दक्षिणमध्ये अनेक ब्लॉगबस्टर चित्रपट दिल्यानंतर रश्मिकाने बॉलीवूडमध्येही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. ‘पुष्पा’ फ्रँचायजी आणि ‘ॲनिमल’मधील कामामुळे रश्मिकाने देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली. अलीकडे प्रदर्शित झालेल्या तिच्या द गर्लफ्रेंड या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता तिचे चाहते तिच्या आगामी बिग बजेट फिल्मची वाट पाहत आहेत. रश्मिकाच्या सहा बिग बजेट आगामी चित्रपटांची नाव आहेत ‘रणबल्ली’, ‘कॉकटेल २’, ‘पुष्पा ३’, ‘मायचा’, ‘Aa22’ व ‘ॲनिमल पार्क’.

रणबल्ली – अलीकडेच नवीन वर्षात घोषणा झालेल्या या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट रश्मिका मंदानासाठी खास आहे. कारण- यामधून ती तिचा नवरा विजय देवरकोंडासह लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. ‘रणबल्ली’ हा एक ऐतिहासिक चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. दोघेही यामधून ऐतिहासिक भूमिकेतून पाहायला मिळणार आहेत. दोघांच्या लग्नानंतर अजय-अतुल यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील प्रोमो साँगही प्रदर्शित झाल्यावर त्याला प्रेक्षकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला. हा चित्रपट २०२६ मध्ये ११ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

कॉकटेल २ – २०२६ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या रश्मिका मंदानाच्या दुसऱ्या चित्रपटाचे नाव आहे ‘कॉकटेल २’. या रोमँटिक कॉमेडी सीक्वेलमधून ती शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनसह स्क्रीन शेअर करणार आहे. अद्याप चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही.

पुष्पा ३ – ‘पुष्पा’ व ‘पुष्पा २’ या चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे २०२६ मध्येच रश्मिकाचा हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.

मायसा – हा एक तेलुगू चित्रपट असून, त्यामध्ये रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत आहे. रवींद्र फुले दिग्दर्शित हा एक ॲक्शन थ्रिलर पॅन इंडिया चित्रपट २० मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Aa22 – ‘पुष्पा ३’व्यतिरिक्त रश्मिका मंदाना अल्लू अर्जुनबरोबर अॅटली यांच्या या आगामी सायन्स फिक्शन चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोणही महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ॲनिमल पार्क ‌- रश्मिका मंदानाकडे असलेल्या सहा चित्रपटांमधील हा शेवटचा चित्रपट आहे. रणबीर कपूर व रश्मिका मंदाना यांची जोडी ‘ॲनिमल’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पहिल्यांदाच ऑनस्क्रीन पाहायला मिळाली. त्यामुळे आता या ब्लॉगबस्टर चित्रपटाच्या सीक्वेन्सची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‌ हा चित्रपटही पुढच्या वर्षीच चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. परंतु, या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही.