Vijay Deverakonda & Rashmika Mandanna First Movie After Marriage : विजय देवरकोंडा व रश्मिका मंदाना सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी नुकतंच २६ फेब्रुवारी रोजी उदयपूर येथे थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रश्मिका व विजय त्यांचा पहिला एकत्र काम केलेला चित्रपट ‘गीता गोविंदम’पासून डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या जोडीने पहिल्यांदा याच चित्रपटात एकत्र काम केलं आणि त्यानंतर ही दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील सुपरहिट जोडी ठरली. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. यानंतरसुद्धा दोघांनी ‘डिअर कॉमरेड’ या चित्रपटात काम केलं. त्यानंतर आता हे दोघे अजून एका चित्रपटातून एकत्र झळकणार आहेत.
रश्मिका मंदानाने दाक्षिणात्य चित्रपटात काम केल्यानंतर बॉलीवूड चित्रपटांतही मुख्य नायिकेच्या भूमिका साकारल्या, तर विजयसुद्धा दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता असून त्यानेही हिंदीत काम केलं आहे. अशातच काही महिन्यांपूर्वी दोघांच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली. रश्मिका व विजय यांचा आगामी चित्रपट आणि त्याची प्रदर्शनाची तारीख याबद्दल जाणून घेऊयात…
लग्नानंतर पहिल्यांदाच ‘या’ चित्रपटात एकत्र झळकणार
राहुल संक्रीतयन (Rahul Sankrityan) दिग्दर्शित ‘राणाबल्ली’ (Ranaballi) या आगामी चित्रपटातून ते तिसऱ्यांदा एकत्र झळकणार आहेत. २६ जानेवारी रोजी त्यांच्या या आगामी चित्रपटाची घोषणा विजयने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत केलेली, त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. विजय व रश्मिका आता लग्नानंतर पहिल्यांदाच या चित्रपटातून एकत्र झळकणार आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठीसुद्धा हा चित्रपट खास ठरेल. रश्मिका व विजय यांचा ‘राणाबल्ली’ हा आगामी चित्रपट ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार १९ व्या शतकातील ही गोष्ट ‘राणाबल्ली’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १८५४ ते १८७८ मध्ये घडलेल्या घटनांवर आधारित आहे. त्यावेळी ब्रिटिशांचं भारतावर राज्य होतं. त्यावेळी ब्रिटिशांनी ४५ ट्रिलीयन डॉलर्स लुटले होते असा उल्लेखही विजयने शेअर केलेल्या या चित्रपटाच्या व्हिडीओतून पाहायला मिळतो. या चित्रपटात विजय स्वातंत्र्यवीर राणाबल्ली यांच्या भूमिकेत झळकणार आहे, तर त्याच्यासह रश्मिका मंदाना जयम्मा हे पात्र साकारणार आहे. या दोघांसह हॉलीवूड अभिनेता अर्नोल्ड वोसलू (Arnold Vosloo) यामध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे.
