Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Wedding Updates : मनोरंजनसृष्टीतील स्टार जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघंही आज ( २६ फेब्रुवारी ) राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकले आहेत. रश्मिका-विजयचा शाही लग्नसोहळा उदयपूरमध्ये पार पडला आहे. या दोघांच्या लग्नाला कुटुंबीय, त्यांचे जवळचे नातेवाईक आणि इंडस्ट्रीमधील काही मोजकेच मित्रमंडळी उपस्थित होते. या जोडप्याने सोशल मीडियावर अद्याप तरी लग्नाचे फोटो शेअर केलेले नाहीयेत. पण, विजयच्या भावाने लग्नसोहळा पार पडल्यावर स्वत: पॅलेसच्या बाहेर येऊन मिठाई वाटप केलं आणि लग्न झाल्याची माहिती ‘विरोश’च्या चाहत्यांना दिली आहे.
हिंदुस्थान टाइम्सला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मिका-विजयने २६ फेब्रुवारीला सकाळी १० वाजून १० मिनिटांनी सात फेरे घेतले. या दोघांचा विवाहसोहळा तेलुगू आणि कोडवा या दोन्ही परंपरेनुसार पार पडला आहे.
साधारण तीन दिवसांपूर्वीच रश्मिका-विजयच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली होती. उदयपूरपासून साधारण २५ ते ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘आयटीसी मेमेंटोस’ ( Mementos by ITC Hotels Ekaaya ) या लक्झरी हॉटेलमध्ये संपूर्ण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हळद, संगीत, ‘विरोश प्रीमियर लीग’, मेहंदी असे सगळे कार्यक्रम पार पडल्यावर आज रश्मिका आणि विजय साता जन्माचे सोबती झाले आहेत.
‘विरोश’चं लग्न पार पडल्यावर पॅलेसच्या बाहेर येऊन कुटुंबीयांनी स्वत: मिठाईचं वाटप केलं. पापाराझींना सुद्धा मिठाईचे बॉक्स देण्यात आले. यादरम्यान, विजयच्या भावाने लग्नसोहळा पार पडल्याची अपडेट सगळ्या चाहत्यांबरोबर शेअर केली. “लग्न झालं का?” असं विचारताच विजयच्या भावाने “हो, लग्न पार पडलंय” अशी माहिती सर्वांना दिली.
रश्मिका व विजय यांनी २०१८ मध्ये ‘गीता गोविंदम’ आणि २०१९ मध्ये ‘डिअर कॉम्रेड’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. मात्र, या दोघांनीही कधीच आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली नव्हती. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात रश्मिका-विजयने हैदराबादमध्ये गुपचूप साखरपुडा उरकला होता. यानंतर आता थेट लग्नाच्या चार दिवस आधी या दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची पहिल्यांदा कबुली दिली.
दरम्यान, आता उदयपूरमध्ये लग्नसोहळा पार पडल्यावर विजय-रश्मिकाने ४ मार्चला त्यांच्या वेडिंग रिसेप्शनचं आयोजन हैदराबादमध्ये केलं आहे. याठिकाणी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत.
