निसर्गाच्या अफाट पसा-यात अनेक गूढ गोष्टी दडलेल्या आहेत. यातील ज्यांचा शोध आपल्याला लागलाय त्याला आपण काही तरी ओळख दिलीये पण त्याहीपलिकडे अशा अनेक अनाकलनीय गोष्टी आहेत ज्यांचं ना काही ठोस नाव आहे ना ओळख. जिथे सत्य असतं तिथे असत्य वावरतं..जिथे सकारात्मकता असते तिथेच नकारात्मक गोष्टीही आढळतात.. जिेथे पारदर्शकता असते तिथेच काही गुपीतंही दडलेली असतात. काहींसाठी ते भास असतात काहींसाठी भासापलिकडे बरंच काही.. याच भास-आभासाचा, सावल्या आणि प्रतिमांचा अनुभव अनेकांना आलेला असतो ज्यातून तयार होतात काही गूढ गोष्टी. ज्या शास्त्रीय पातळीवर शोधून बघितल्या तर कदाचित शक्यही वाटतात आणि त्यापलीकडे जाऊन विचार केला तर तेवढ्याच रहस्यमय होत जातात.. नश्वरतेचा नियम उर्जेला लागू होत नाही.. उर्जा नष्ट होत नसते ती एका गोष्टीतून  दुस-या गोष्टीत परावर्तित किंवा रुपांतरीत होत असते. मग हे गूढ भास आणि या अनाकलनीय गोष्टींमागे अशीच एखादी उर्जा तर दडली नसेल.. काय असेल ती रहस्यमय गोष्ट जी अनेकांना भीतीदायक वाटते आणि जिचा अनुभव बहुतेक वेळा रात्रीच येतो.. ती गोष्ट रात्रीच्या काळोखात दडलेली असते की स्वतःच्या मनातच भीती बनून लपलेली असते जी रात्रीच्या अंधारात मनाची कोंडी फोडून बाहेर पडते… रात्रीच्या काळोखात घडणा-या भास आभासाच्या अशाच रंजकतेची गोष्ट आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या अतिशय वेगळ्या धाटणीच्या मालिकेतून. २२ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. ही मालिका प्रसारित होणार आहे.
कोकणात आजही अनेकांच्या गजाली (गप्पा) हा आवडीचा विषय यात भुता-खेताच्या गोष्टी सर्वाधइक चर्चेत असतात. कुणाकडून ऐकलेल्या, पूर्वापार चालत आलेल्या समज-गैरसमजांवर या गोष्टी आधारलेल्या असतात. या सर्वांत एक समान धागा असतो तो म्हणजे रात्रीचा. विश्वास आणि अविश्वास यांच्या पुसटशा सीमारेषेवर या गोष्टी आधारित असतात. अशाच काही ऐकीव, काल्पनिक गोष्टींवर ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेची कथा आधारलेली आहे. ही गोष्ट आहे कोकणातल्या नाईक कुटुंबाची. या कुटुंबात चार भावंडे. यापैकी माधव आणि त्याची बायको निलिमा नोकरीनिमित्ताने शहरात स्थायिक झालेली. गावी ब-याच दिवसांनतर घरात एक शुभकार्य होणार आहे. त्यासाठी माधव आपल्या कुटुंबासह कोकणात निघालाय. गावी पोहचल्यानंतर एकामागोमाग एक अतार्किक घटनांची मालिका सुरू होते. माधवची बायको निलिमा जी स्वतः शास्त्रज्ञ आहे ती या सर्व घटनांमागचं गुढ शोधण्याचा निर्णय घेते. नाईक कुटुंबावर पसरलेल्या या भीतीच्या सावटाला नेमकं कोण जबाबदार असेल ? खरंच यामागे काही गूढ शक्ती असेल की कुणी जवळच्याच व्यक्तीने रचलेली ती एक खेळी असेल ? यामागचं सत्य जाणून घेण्यात नाईक कुटुंब यशस्वी होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या मालिकेतून उलगडत जातील.
मालिकेमध्ये बहुतेक सर्वच कलाकार छोट्या पडद्यासाठी नवीन असले तरी विविध नाटकांमधील भूमिकांचा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. या कलाकारांव्यतिरिक्त कोकणचा परिसर, तेथील जुन्या पद्धतीचं कौलारू घर, त्याबाहेरील मोठं अंगण, वड-पिपंळाचं झाड, त्याखालची विहीर ही देखील या मालिकेतील मुख्य पात्रच आहेत. या मालिकेचं संपूर्ण चित्रीकरण हे कोकणातील एका गावात होत आहे. या मालिकेची कथा आणि पटकथा संतोष अयाचित आणि आशुतोष परांडकर यांची आहे तर संवाद प्रल्हाद कुडतरकरचे आहेत. साजरी क्रिएटिव्ह्सची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन राजू सावंत यांनी केलय. भास आणि आभासांच्या रंजक विभ्रमांनी विणलेली ही कथा ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून येत्या २२ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. झी मराठीवरून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.