सध्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांमध्ये अजय-अतुल हे नाव आवर्जून घेतलं जातं. केवळ मराठीतच नाही तर हिंदी आणि तेलुगू भाषांमधील चित्रपटांसाठीही या जोडीने संगीत दिग्दर्शन केलंय. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या जोडीने ‘जोगवा’, ‘अगं बाई अरेच्चा’, ‘अग्निपथ’, ‘सैराट’ यांसारख्या चित्रपटांना अप्रतिम संगीत दिलं. अजय-अतुलचं संगीत अनेकांनाच मंत्रमुग्ध करतं. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानसोबतंही असंच काहीसं झालेलं आहे.

अजय-अतुलपैकी आज अजय गोगावलेचा वाढदिवस. त्या निमित्ताने दिग्दर्शक रवी जाधवने फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. अजयसोबतची एक सुरेख आठवण त्यांनी या व्हिडिओद्वारे शेअर केली आहे. यामध्ये अजय ‘जीव रंगला’ हे गाणं गाताना दिसतोय, तेथे उपस्थित असलेला आमिर खान, अतुल कुलकर्णी, आमिर खानची पत्नी किरण राव त्याच्या आवाजाने मंत्रमुग्ध झाल्याचे दिसते.

वाचा : …म्हणून करिनाच्या मागे धावून आली ‘ती’ वृद्ध महिला 

‘माझा हुशार मित्र, संगीतप्रेमी अजय गोगावलेसोबतचा हा सुरेख क्षण आहे. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू संगीताला अत्युच्च पातळीवर नेलं आहेस,’ असं कॅप्शन रवी जाधवने या व्हिडिओला दिलंय. आतापर्यंत ३२ हजार जणांनी या व्हिडिओला पाहिलं असून त्याला एक हजारपेक्षाही अधिक लाइक्स मिळाले आहेत.