Ravi Kishan Meme : अभिनेते आणि लोकसभा खासदार रवि किशन हे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. त्यांनी गायलेले ‘शिव कोटेश्वराय’ किंवा पॉडकास्टमधील ‘मनी फॉलो मॅन’, अशा डायलॉगमुळे ते व्हायरल झाले आहेत. रवि किशन यांचा डान्स असो वा डायलॉग, त्यांची प्रत्येक गोष्ट तरुणांच्या पसंतीस उतरत असून ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्यावर आधारित अनेक मीम्स आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रवि किशन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यापूर्वी रवि किशन यांनी मनोरंजन विश्वामध्ये काम केले असून काही सिनेमांमध्ये भूमिका साकारली होती. राजकारणामध्ये आल्यानंतरही रवि किशन हे त्यांच्या जुन्या सिनेमांवरून आणि पॉडकास्टमधील वक्तव्य, डान्स यांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत. रवि किशनची कोणत्याही घटनेवर दिलेली प्रतिक्रिया आणि त्यांचे हावभाव यावरून नेटकऱ्यांनी मजेदार मीम्स केले आहेत. या व्हायरल मीम्सवर रवि किशन यांनी न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्या शरीरामध्ये अमिताभ बच्चन अन् शाहरुख खान
रवि किशन यांनी त्यांच्या हटके स्टाइलबद्दल मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “माझ्या शरीरामध्ये अल पचिनोपासून (Al Pacino) अमिताभ बच्चन, बलराज साहनी, शाहरुख खान, मायकेल जॅक्सन आणि एल्विस प्रेस्लीपर्यंत असे अनेक कलाकार नाचतात आणि गात असतात, त्यामुळे मी हे असं फ्युजन करत असतो, ज्यामुळे देशातील सर्वजण माझे फॅन होतील. मी तीच व्यक्ती आहे, जिने २० वर्षांपूर्वी हिंदीमध्ये डायलॉग म्हटला होता, ‘जिंदगी झंडवा, फिर भी घमंडवा.’”
मी काहीही केलं तरी ते व्हायरल – रवि किशन
पुढे ते म्हणाले, “मी मुद्दाम काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत नाही आणि जे व्हायरल होत आहे, ते कधीही वाचतही नाही. जाणून-बुजून अशा गोष्टींचा अभिनय करत नाही किंवा ठरवून वेगळ्या पद्धतीने बोलत नाही. मी असाच आहे. फक्त तो क्षण येतो आणि माझ्या शरीरात काहीतरी घडतं, त्यानंतर आपोआप मी असे शब्द बोलून जातो. मी काहीही केलं तरी ते व्हायरल होतं. संसदेत धावत जात असो किंवा आणखी काही करो, तरी ते व्हायरल होतंच.”
सोशल मीडियावर सर्वत्र रवि किशन यांची चर्चा सुरू आहे. याबाबत ते म्हणाले, “असं म्हणतात की तुमची चांगली वेळ आली की लोकांना तुमची प्रत्येक गोष्ट आवडू लागले, त्यामुळे सध्या माझी चांगली वेळ सुरू आहे. देवाचा आशीर्वाद, पूर्वजांचे आशीर्वाद, कुटुंबीय आणि माझ्या चाहत्यांचे प्रेम यांवर माझा विश्वास आहे.”
रवि किशन यांचे व्हायरल मीम्स
सोशल मीडियावर रवि किशन यांच्या जुन्या सिनेमातील डायलॉग आणि गाणी व्हायरल होत आहेत. एकदा संसदेमध्ये ते धावत जात असताना ‘जल्दी द लेट’ असे म्हणाले होते. तसेच एका पॉडकास्टमध्ये ‘मनी फॉलो मॅन, मनी फॉलोज्…’ असा डायलॉग म्हटले होते. सेल्फी व्हिडीओमधील त्यांचे एक्स्प्रेशन आणि स्टेजवर केलेला खास डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी ‘कोटेश्वराय ते शिव कोटेश्वराय’ हे गाणं सुरेल आवाजामध्ये म्हटले होते. याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून रवि किशन यांच्यावर अनेक मीम्स तयार करण्यात आले आहेत.
सिनेविश्वानंतर राजकारणाकडे वळाले रवि किशन
दरम्यान, मनोरंजन विश्वामध्ये वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर रवि किशन हे राजकारणामध्ये आले आहेत. ते सध्या गोरखपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार आहेत. त्यांच्या संसदेतील आणि राजकीय भाषणांना चाहत्यांचा खूप प्रतिसाद मिळत असतो. त्यांची हटके स्टाईल, बोलण्याची पद्धत आणि त्यांच्या उत्साही व्यक्तिमत्त्वामुळे रवि किशन हे चर्चेत आले आहेत.
