सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा अभिनेते रवी किशन यांची होतेय. त्यांच्या अनेक रील्स इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहेत. नीट वर्तमानपत्र, होम फ्रॉम वर्क, अलायन्स शोमधील एक्झिट आणि त्यांचे डान्स व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. अशातच त्यांच्या एका मुलाखतीची क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हिडीओत ते आपल्या गरिबीच्या दिवसांची आठवण सांगत आहेत. इतकी गरिबी पाहिली आहे की आताही सेव्हन स्टार हॉटेलला गेल्यावर खिचडी ऑर्डर करत असल्याचं त्यांनी सांगितलं, यावर नेटकऱ्यांन संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
वर्षभरापूर्वी शुभांकर मिश्राला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते आणि खासदार रवी किशन यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. गरिबी आणि संघर्षाच्या दिवसांची आठवण काढताना ते म्हणाले होते की, आज इतके यश मिळवल्यानंतरही ७ स्टार हॉटेलमध्ये महागडे जेवण ऑर्डर करताना त्यांना संकोच वाटतो.
गरिबीतल्या त्या आठवणी आजही डोक्यातून जात नाहीत, असं रवी किशन यांनी म्हटलं होतं. “गरीबीचा परिणाम आजही माझ्या विचारांवर आणि सवयींवर खोलवर आहे. आताही मी कोणत्याही ७ स्टार हॉटेलमध्ये गेलो-मग ते प्रॉडक्शनच्या खर्चाने असो, माझ्या स्वतःच्या खर्चाने असो किंवा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी पाहुणा म्हणून गेलो असो, तरीही महागडं जेवण मागवण्याऐवजी मी खिचडीच मागवतो,” असं रवी किशन म्हणाले होते.
पाहा रवी किशन यांचा व्हिडीओ
“हॉटेलमध्ये कपडे लाँड्रीला देण्यासही मला संकोच वाटतो. हे कपडे मुंबई, दिल्ली किंवा गोरखपूरच्या घरी नेऊनच धुवून घेईन, असाच विचार मनात येतो. गरिबीचा तो काळ निघून गेला असला, तरी त्या सवयी मात्र आजही माझ्या विचारांमध्ये आहेत,” असं रवी किशन म्हणाले होते.
रवी किशन यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी म्हटलं की अशी गरिबी देव सर्वांना देवो, तर काहींनी रवी किशन अतिशयोक्ती करत असल्याचं म्हटलंय. “तुम्हाला गरिबी काय असते ते जाणून घ्यायचं असेल तर सर्वसामान्य लोकांना विचारा,” असंही एका युजरने म्हटलं.
रवी किशन आता कोट्यवधींचे मालक असले तरी एकेकाळी त्यांनी हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढले. त्यामुळे पैसे विचारपूर्वक खर्च करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
