पोन्नियिन सेल्वन फेम अभिनेता रवी मोहन सप्टेंबर २०२४ मध्ये पत्नी आरती रवीपासून विभक्त झाला. जाहीरपणे घटस्फोटाची पोस्ट केल्यावर दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. आपल्याला अनवाणी घराबाहेर काढण्यात आलं असा आरोप रवीने केला होता. तर रवी व आपल्या नात्यात तिसरी व्यक्ती आल्याचा दावा आरतीने केला होता. यानंतर रवीचे नाव गायिका केनिशा फ्रान्सिसबरोबर जोडलं जातंय.

नुकतेच रवी व केनिशाने एकत्र फोटो शेअर केल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. या ट्रोलिंगवर रवीने प्रतिक्रिया दिली आहे. “पुरुष हे सर्वात मोठे बळी असतात,” असं रवी म्हणाला.

रवी व केनिशाचे पूजेचे फोटो आणि टीका

रवी मोहनने दिग्दर्शनात पदार्पण करतोय. ‘अॅन ऑर्डिनरी मॅन’ असं सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाच्या पूजा समारंभाचे फोटो रवीने शेअर केले. या फोटोंमध्ये रवी चित्रपटाचा मुख्य अभिनेता योगी बाबूबरोबर दिसत आहे. या फोटोंमध्ये रवी आणि केनिशा यांनी गळ्यात हार घातले असून ते एकत्र पोझ देताना दिसत आहेत. “देवाच्या आशीर्वादाने या प्रवासाची सुरुवात होत आहे,” असं कॅप्शन या फोटोंना दिलंय.

रवी व केनिशाचे पाहून इंटरनेटवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विजय व त्रिशाच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे काही युजर्सनी हे फोटो शेअर करण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर काहींनी विवाहबाह्य संबंध आता सामान्य झाले आहेत, असं लिहिलं. ‘प्रवास सुरू झालेला नाही… तुझा सिनेसृष्टीतील प्रवास संपला आहे,’ ‘सेलिब्रिटी विवाहबाह्य संबंधांना सामान्य ठरवत आहेत आणि त्यांना त्याचा अभिमान आहे,’ ‘त्रिशा व विजयची चर्चा होऊ नये म्हणून रवी व केनिशा यांनी फोटो पोस्ट केलेत,’ अशा कमेंट्स या पोस्टवर आहेत.

काय म्हणाला रवी मोहन?

मोठ्या प्रमाणात टीका झाल्यावर रवी मोहनने ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.कमेंट्सना उत्तर देत रवीने लिहिलं, “मी शांतपणे माझं आयुष्य पुन्हा उभं करतोय. मी पुन्हा हे लिहायचं ठरवलंय: तुम्हाला जे काही बोलायचंय ते बिनधास्त बोला, कारण तुम्हाला असं वाटतं की फक्त स्त्रियाच बरोबर असतात. पुरुष हे सर्वात मोठे बळी असतात आणि आता आपली न्यायव्यवस्था देखील हेच समजतेय. एक दिवस तुम्हा सर्वांना माझं म्हणणं पटेल आणि मी ज्यांच्यावर प्रेम केलं, त्यांच्यासाठी मी काय केलंय हे समजेल. प्लीज मला शांतपणे जगू द्या आणि तुमचे वाईट विचार तुमच्याकडेच ठेवा. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतोय.”

रवी मोहन आणि आरती रवी यांचे लग्न व घटस्फोट

रवी मोहन यांनी २००९ मध्ये आरतीशी लग्न केलं होतं. या जोडप्याला आरव आणि अयान अशी दोन मुलं आहेत. सप्टेंबर २०२४ मध्ये रवीने आरतीपासून विभक्त होत असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. रवीने लग्नानंतर मानसिक आणि आर्थिक छळाचा सामना करावा लागला, असा आरोप केला होता. तर दुसरीकडे, आरतीने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून रवीने तिची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.

सुरुवातीला रवीने अफेअरच्या अफवा फेटाळल्या. पण मे २०२५ मध्ये एका लग्नात रवी आणि केनिशा फ्रान्सिस पहिल्यांदाच एकत्र दिसले. त्यांनीही ट्विनिंग केलं होतं.