दाक्षिणात्य स्टार रवी प्रकाश यांनी आतापर्यंत विविध कथानक असलेल्या अनेक चित्रपटांत काम करत त्यांच्या दमदार अभिनयाने अनेकांची मनं जिंकली आहेत. येत्या काळातही ते अनेक दर्जेदार चित्रपटांतून झळकणार आहेत. पण सध्या ते चर्चेत आहेत ते कुठल्या दाक्षिणात्य चित्रपटासाठी नाही तर एका मराठी चित्रपटामुळे. अभिनेते रवी प्रकाश येत्या काळात ‘दशमी’ या मराठी चित्रपटात झळकणार आहेत. अशातच यासाठी त्यांनी मराठी शिकल्याचंही म्हटलं आहे.

‘मंगलाष्टक रिटर्न्स’, ‘बाजार’, ‘आम्ही जरांगे’ अशा चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक, निर्माता योगेश भोसले दिग्दर्शित ‘दशमी’ या चित्रपटातून रवी प्रकाश झळकणार आहेत. हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट असून यासाठी मराठी शिकल्याचं त्यांनी नुकतंच माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं आहे. अलीकडेच पार पडलेल्या ‘दशमी’ चित्रपटाच्या पोस्टर लाँच सोहळ्याला रवी प्रकाश यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ते मराठी कशी शिकले, त्यासाठी त्यांनी काय याबद्दल सांगितलं आहे.

रवी प्रकाश या चित्रपटातून महत्त्वपूर्ण भूमिकेतून दिसणार असल्याने चित्रपटाबद्दही क्रेझ निर्माण झाली आहे. अशातच आता या चित्रपटासाठी आपण मराठी कशी शिकलो याबद्दल सांगताना त्यांनी एका लोकप्रिय मराठी मालिकेचा उल्लेख केला. ही मालिका दुसरी तिसरी कोणती नसून ‘स्टार प्रवाह’वरील ज्ञानदा कदम व मृणाल दुसानिस यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी या मालिकेतील नायक विजय आंदळकर व मालिकेत धनंजय मोहिते ही भूमिका साकारणारे अभिनेते प्रसन्न केतकर यांच्याबद्दलही सांगितलं आहे.

रवी प्रकाश काय म्हणाले?

रवी प्रकाश याबद्दल म्हणाले, “मराठी शिकण्यासाठी मी एक मराठी मालिका पाहायला सुरु केलं होतं. त्या मालिकेचं नाव आहे लग्नानंतर होईलच प्रेम. योगायोग म्हणजे मी ही मालिका पाहत असताना मालिकेत काम करणारे प्रसन्न केतकर आमच्या सेटवर आले आणि मी म्हटलं अरे आता तर यांना मी लॅपटॉपवर पाहत होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या महिन्यात मी एका कार्यक्रमात गेलो असताना मालिकेतील नायक विजय आंदळकरही तिथे उपस्थित होता. त्यामुळे हो जर मी सध्या कुठली मराठी कलाकृती पाहत असेन तर ती हिच मालिका आहे.”

दरम्यान, योगेश भोसले दिग्दर्शित ‘दशमी’ हा चित्रपट येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. रवी प्रकाश यांच्यासह या चित्रपटात मराठी इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय कलाकार झळकणार आहे. अभिनेत्री गौरी इंगवले चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.