जॉन अब्राहम याची मुख्य भूमिका असलेला ‘रोमियो अकबर वॉल्टर’ अर्थात ‘रॉ’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई करत असला तरी चित्रपटातील जॉनचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. १९७१ सालच्या युद्धातील एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. ‘रॉ’मध्ये भारत-पाकिस्तान युद्धातील एका गुप्तहेराची कथा दाखविण्यात आली असून जॉनने या चित्रपटामध्ये गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी भारतीय गुप्तचर यंत्रणा (रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनलिसिस विंग) रॉसाठी या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं.

गुप्तचर यंत्रणा (रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनलिसिस विंग) रॉसाठी या स्क्रिनिंगचं आयोजन करणं अत्यंत कठीण होतं. मात्र चित्रपटाच्या टीम अथक प्रयत्नानंतर हे स्क्रिनिंग करणं शक्य झालं. या स्क्रिनिंगवेळी रॉचे प्रमुख अनिल कुमार धस्माना आणि अन्य काही अधिकारी उपस्थित होते.

“रॉ अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी खास स्वतंत्र स्क्रिनिंग ठेवण्यात आलेला हा पहिला चित्रपट आहे. या स्क्रिनिंगवेळी चित्रपटाचे दिग्दर्शक रॉबी ग्रेवाल आणि रॉ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अभिनेता जॅकी श्रॉफदेखील उपस्थित होते. रॉ अधिकाऱ्यांच्या सन्मानासाठी मी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट रॉ अधिकाऱ्यांच्या पसंतीत उतरला असून त्यांनी या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत”, असं रॉबी ग्रेवाल यावेळी म्हणाला.

या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम, मौनी रॉय, सिकंदर खेर, सुचित्रा कृष्णमूर्ती, रघुबीर यादव यांच्या मुख्य भूमिका आहेत. १९७१ सालच्या युद्धातील एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. रॉमध्ये जॉनने गुप्तहेराची भूमिका साकारली आहे.