ख-या आयुष्यातील हे जोडीदार बनले ‘रिल लाइफ कपल’

लग्नानंतर प्रथमच हे दोघे चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

खऱ्या आयुष्यातल्या अनेक जोडीदारांनी आजवर रुपेरी पडद्यावर एकत्र काम केलं आहे. या यादीत आणखी एका जोडीची भर पडली आहे. अभिनेता सौरभ गोखले व अभिनेत्री अनुजा साठे ही जोडी २२ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘भो भो’ या चित्रपटात पहिल्यांदाच ऑन स्क्रीन दिसणार आहेत. लग्नानंतर प्रथमच अभिनेता सौरभ गोखले व त्याची पत्नी अनुजा या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
‘योद्धा’,‘शिनमा’, ‘परतु’ या सिनेमातून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या सौरभ व सध्या गाजत असलेल्या तमन्ना या मालिकेत हटके भूमिका साकारणाऱ्या अनुजाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता ते आपल्या पहिल्या एकत्रित सिनेमाबद्दलही तितकेच उत्सुक आहेत. चांगली कथा असल्यामुळे या चित्रपटाला आम्ही होकार दिल्याचं सांगत हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल असा विश्वास या दोघांनीही बोलून दाखवला.
‘सुमुखेश फिल्म्स’ प्रस्तुत आणि भरत गायकवाड निर्मित- दिग्दर्शित ‘भो भो’ हा सस्पेन्स थ्रिलर असून तो विनोदी शैलीत मांडण्यात आला आहे. या चित्रपटात या दोघांसोबत प्रशांत दामले, सुबोध भावे, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, संजय मोने, किशोर चौगुले अशी तगडी स्टारकास्ट आहे. रिअल लाईफ दाम्पत्याची रील लाईफ केमिस्ट्री कशाप्रकारे रंगणार हे पडद्यावर पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. २२ एप्रिलला “भो भो” चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Real life couple saurabh gokhle and anuja will become a reel life couple

ताज्या बातम्या