|| स्वप्निल घंगाळे

रिअ‍ॅलिटी शो म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठय़ा येतात. मात्र मागील दीड महिन्यापासून भारतामध्ये एका रिअ‍ॅलिटी शोची समाजमाध्यमांपासून ते अगदी गप्पांपर्यंत सर्वत्र चर्चा राहिली. हा कार्यक्रम म्हणजे ‘शार्क टँक इंडिया’! रिअ‍ॅलिटी शो म्हटल्यावर नाकं मुरडणाऱ्या प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या याच कार्यक्रमाच्या यशावर टाकलेली नजर..

All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

तुम्ही आतापर्यंत संगीत क्षेत्रातील, नृत्य किंवा स्टंटबाजी असणारे अनेक रिअ‍ॅलिटी शो पाहिले असतील. पण जर एखाद्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांप्रमाणेच सामान्य कुटुंबातून आलेल्या उद्योजकांना लाखो रुपयांची मदत करणारे उद्योजक असतील आणि उद्योगाची कल्पना आवडल्यानंतर स्वत: मोठय़ा मोठय़ा कंपन्यांचे संस्थापक या सर्वसामान्यांना उद्योगात सर्व प्रकारची मदत करण्याची ऑफर देत असतील तर असा कार्यक्रम बघायला अनेकांना नक्कीच आवडेल. याच हटके रचनेमुळे सध्या भारतीय प्रेक्षकांनी आणि त्यातही खासकरून तरुणाईने डोक्यावर घेतलेला कार्यक्रम ठरला, ‘शार्क टँक इंडिया’. हल्ली सामान्यपणे एखाद्या गोष्टीचे मिम्स बनू लागले की ती चर्चेत आहे असं समजलं जातं. याच मोजमापानुसार सध्या ‘शार्क टँक इंडिया’ची चलती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

या कार्यक्रमाची रचना फार सोपी आहे. या कार्यक्रमात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मोठय़ा कंपन्यांच्या मालकांना ‘शार्क’ म्हटलं जातं. त्यांच्यासमोर येऊन नवउद्योजक म्हणजेच स्टार्टअप कंपन्या सुरू केलेले अनेकजण आपल्या कंपनीतील काही हिस्सेदारीच्या मोबदल्यात आर्थिक मदत घेतात. आपली कंपनी काय आहे, ती काय उत्पादन बनवते, नफा-तोटय़ाची गणितं असं सारं या शार्कसमोर उद्योजक मांडतात. त्यानंतर शार्कपैकी ज्यांना समोरच्याची कल्पना आवडली असेल ते एकतर मागितलेली रक्कम देतात किंवा केलेल्या मागणीपेक्षा कमी जास्त रक्कम देऊन ‘डील’ करतात. अमेरिकेमध्ये २००९ पासून ‘शार्क टँक’ नावाचा हा रिअ‍ॅलिटी शो सुरू आहे. मात्र भारतामध्ये सध्या नवउद्योजकांची लाट आली असून याच पार्श्वभूमीवर सोनी टीव्हीने हा कार्यक्रम २० डिसेंबर २०२१ पासून सुरू केला आणि या कार्यक्रमाचा शेवटचा म्हणजेच ३५ वा भागही प्रदर्शित झाला. तरी हा शो अजूनही सोनी लिव्हवर पाहिला जातो आहे. एकूण १९८ वेगवेगळय़ा नवउद्योजकांनी आपल्या उद्योगांची संकल्पना या शार्कसमोर मांडली. त्यापैकी ७० हून अधिक उद्योगांना या कार्यक्रमातील शार्क म्हणजेच बडय़ा उद्योजकांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.

शार्क कोण?

हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झाला आहे की ‘शार्क टँक इंडिया’मधील ‘शार्क’ हे आज घरोघरी ओळखीचे चेहरे झाले आहेत. अमन गुप्ता, पियुष बन्सल, अनुपम मित्तल, अशनीर ग्रोव्हर, नमिता थापर यासारखे चेहरे तर आता तरुणाईला लगेच ओळखू येऊ लागलेत. भारतातील पहिल्या पर्वामध्ये एकूण सात बडे उद्योजक शार्क म्हणून सहभागी झाले होते. यात ‘शुगर कॉस्मॅटिक’ कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक विनिता सिंग, ‘ममाअर्थ’ कंपनीच्या संस्थापक असणाऱ्या गझल अलघ, ‘पिपल ग्रुप’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपम मित्तल, ‘इमिक्युअर फार्मास्युटिकल्स’च्या नमिता थापर, लेन्सकार्टह्णचे पियूष बन्सल, बोटह्ण या डिजिटल डिव्हाइस बनवणाऱ्या कंपनीचे सहसंस्थापक अमन गुप्ता, भारत पेह्णचे संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांचा समावेश होता. या पहिल्या पर्वामध्ये सर्वाधिक गुंतवणूक अमन यांनी केली असून त्यांनी २७ कंपन्यांमध्ये नऊ कोटींहून अधिक रुपये गुंतवले आहेत. इतरही शार्कने अगदी सात – आठ कोटींपासून दीड कोटींपर्यंतची एकूण गुंतवणूक केली आहे. या सात जणांची लोकप्रियता इतकी वाढली आहे की इंटरनेटवर या लोकांबद्दलचे मिम्स, माहितीचे लेख आणि व्हिडीओ व्हायरल झालेत.

 तरुणाईला का आवडला हा कार्यक्रम?  मागील दीड महिन्यापासून सगळीकडे चर्चेत असणाऱ्या या कार्यक्रमामधून भारताच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये आपल्या वेगवेगळय़ा संकल्पना घेऊन आलेल्या नवउद्योजकांनी गुंतवणूकीसाठी प्रस्ताव मांडले. यावर होणाऱ्या चर्चा, त्या चर्चादरम्यान नेहमी ऐकायला मिळणारे उद्योगांशी संबंधित इक्विटी, ग्रॉस मार्जिन, व्हॅल्यूएशन यासारखे शब्द हे सारं तरुणाईला फार आपलंसं वाटलं. हल्ली स्टार्टअपच्या चर्चा अगदी व्हॉट्सअपपासून ते चहावरच्या टपरीवर करणारी तरुणाई या शोसोबत जास्त चांगल्या पद्धतीने स्वत:ला जोडू शकली आणि म्हणूनच हा शो एवढा यशस्वी झाला. या कार्यक्रमासाठी एकूण ६२ हजार नवउद्योजकांनी अर्ज केले होते. त्यापैकी केवळ १९८ जणांना थेट शार्कसमोर आपला प्रस्ताव मांडता आला. ज्यापैकी ६७ कंपन्यांमध्ये या सात शार्कने एकत्र किंवा संयुक्तपणे गुंतवणूक केली.

या अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील अडचणींवर उत्तरं शोधणाऱ्या कंपन्या, संकल्पनांना चालना दिली पाहिजे अशी मतं या कार्यक्रमाचे अनेक चाहते समाजमाध्यमांवरून व्यक्त करताना दिसत आहेत. अशा पद्धतीचे रिअ‍ॅलिटी शो हे नवउद्योजकांना थेट मदत तर करतातच पण या अशा कार्यक्रमांमधून अनेकांना प्रेरणा मिळते आणि काहीतरी नवीन करण्यासाठी ते प्रेरित होतात असंही अनेकांचं म्हणणं आहे. 

 कंपन्यांचे मालक कोण?

या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या नवउद्योजकांबद्दलची काही रंजक माहिती अनुपम यांनी कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रदर्शित झाल्यानंतर दिली होती. या कार्यक्रमात आपल्या कंपन्यांसाठी गुंतवणूक मागणाऱ्या १९८ कंपन्यांच्या संस्थपकांपैकी ८७ टक्के म्हणजेच ५९ नवउद्योजक हे आयआयटी किंवा आयआयएममध्ये शिकलेले नाहीत, असं अनुपम सांगतात. तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या कंपन्यांपैकी ६७ टक्के म्हणजेच ४५ कंपन्यांचा किमान एक सहसंस्थापक २५ वर्षांपेक्षा कमी वयाचा होता. यापैकी ६० टक्के कंपन्यांच्या संस्थापकांचा उद्योग क्षेत्रातील हा पहिलाच प्रयत्न होता. कार्यक्रमात सहभागी झालेल्या कंपन्यांपैकी ३० टक्के कंपन्या या ग्रामीण किंवा दुय्यम स्तराच्या शहरांमधील होत्या, असं अनुपम यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरेंनीही घेतली दखल

या कार्यक्रमाच्या पाचव्या भागामध्ये नाशिकमधील एक इलेक्ट्रॉनिक बाईक बनवणाऱ्या कंपनीचे संस्थापक सहभागी झाले होते. जयेश टोपे, प्रितेश महाजन आणि पुष्कराज साळुंखे या तरुणांनी सुरू केलेल्या ‘रिव्हॅम्प’ कंपनीला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली होती. कंपनीची ‘रिव्हॅम्प मित्रा’ आणि ‘एसएम२५’ या दोन्ही स्कूटर सर्वानाच आवडल्या. अमन गुप्ता आणि अनुपम मित्तल यांनी एकत्रितपणे या कंपनीत गुंतवणूक केली. मात्र या कार्यक्रमाचा हा भाग महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही पाहिला. त्यांनी २८ जानेवारी रोजीच्या आपल्या नाशिक दौऱ्यामध्ये या कंपनीला भेट दिली. स्वत: आदित्य ठाकरेंनी यासंदर्भात ट्विटरवरून माहिती दिली. ‘‘काही दिवसांपूर्वीच मला शार्क टँक इंडियामधील एका क्लिपमधून नाशिकमधील रिव्हॅम्प या कंपनीबद्दल कळलं. ही कंपनी पूर्णपणे भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रिक बाईक्स बनवते. आज मी नाशिकमध्ये असताना या कंपनीच्या टीमला भेटलो. या कंपनीकडून निर्माण केल्या जाणाऱ्या गाडय़ांची संख्या वाढवण्यासाठी आणि इलेक्ट्रिक गाडय़ांचा वापर वाढवण्यासाठी आपण एमआयडीसोबत एकत्र काम कसं करू शकतो, याबद्दल चर्चा केली,’’ असं आदित्य यांनी सांगितलं.

नवं काही : ‘रूद्रा – द एज ऑफ डार्कनेस’

तद्दन गुन्हेगारीपट, थरार आणि रोमांचकारी अनुभव या सर्वाचे मिश्रण प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारी वेबमालिका म्हणजे अभिनेता अजय देवगण याची ‘रूद्रा – द एज ऑफ डार्कनेस’ म्हणता येईल. सुपरस्टार अजय देवगण ‘रूद्रा – द एज ऑफ डार्कनेस’मधून ओटीटीवर पदार्पण करतो आहे. ब्रिटिश थरारपट ‘लुथर’ या अतिशय गाजलेल्या वेबमालिकेचा हा हिंदी रिमेक असून ‘लुथर’च्या ऐवजी ‘रूद्रा’ असे पात्राचे हिंदी नामकरण केलेले आहे. रूद्रा हे पात्र अजय देवगण साकारत असून सत्याचा सातत्याने शोध घेणाऱ्या आणि अन्यायग्रस्तांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी लढणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका त्याने यात निभावली आहे. ‘बीबीसी स्टुडिओज् इंडिया’च्या सहकार्याने ‘अप्लॉज् एंटरटेनमेंट’ निर्मित ‘रूद्रा – द एज ऑफ डार्कनेस’मध्ये अनेक रहस्य, गुन्हेगारी चेहरे, रक्तपात, गुन्हेगारांचा माग आणि न संपणारा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. डीसीपी रूद्रा वीर सिंग (अजय देवगण) हा काही गुन्हेगारांच्या मागावर आहे. त्यातून त्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी रूद्राने अनेक गुप्तहेरसुद्धा लावलेले आहेत. रूद्रा स्वत:चा जीव पणाला लावून सत्याचा शोध घेत असतो. गुन्हेगारांच्या मागे असताना रूद्रासाठी रोज नवीन धोके निर्माण होत राहातात, ज्यातून तो सामर्थ्यांने मार्ग काढत जातो. प्रत्येक उद्भवणाऱ्या धोक्यातून वाट काढत काढत हुशारीने गुन्हेगारांना शोधताना रूद्रापुढील उलगडत जाणारी रहस्ये हा या वेबमालिकेचा प्रमुख भाग असून ही वेबमालिका हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मराठी, मल्याळम आणि बंगाली भाषेत प्रदर्शित झाली आहे. वेबमालिकेचे दिग्दर्शन राजेश मापूस्कर यांनी केले असून समीर नायर मालिकेचे निर्माते आहेत.

कलाकार –  अजय देवगण, ईशा देओल, राशी खन्ना, अतुल कुलकर्णी, अश्विनी काळसेकर आणि आशीष विद्यार्थी.  कधी – ४ मार्चपासून प्रदर्शित 

कुठे –  डिस्ने प्लस हॉटस्टार

‘सुतलियान’

एकमेकांपासून दूर दूर राहणारा चंडेल परिवार  दिवाळीच्या निमित्ताने  एकत्र येतो आणि आपल्या घरात पूर्वी ज्याप्रमाणे दिवाळी साजरी व्हायची तसाच आताही हा दिवाळीचा सण एकत्रितपणे साजरा करण्याचा निर्णय ते घेतात. टाळेबंदीच्या आधीच या परिवारातील कर्त्यां पुरुषाचे निधन होते, मात्र वडिलांचे अंतिम संस्कार करण्यासाठी घरी येण्याएवढाही वेळ मुलांकडे नसतो. अखेर घरातील सगळे हेवेदावे विसरून एकत्र येण्याचा मानस या घरातील नव्या-जुन्या पिढीतील मंडळींना एकत्र आणतो, परिणामी नव्याने त्यांच्यातील नाते बहरू लागते. जुन्या पिढीला नव्या पिढीची नव्याने ओळख होते आणि नव्याला जुन्या पिढीची.. त्याचबरोबरीने एकामागून एक घडणाऱ्या प्रसंगांतून परिवार काय, नाती- त्यातील मायेची उब काय असते? याची जाणीवही आपल्या धावपळीच्या जगात रमलेल्या चंडेल परिवारातील तरुणाईला होते. या वेवमालिकेतून आई-मुलांचे एक हळवे नाते प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुतळी किंवा दोऱ्यांपासून बनणाऱ्या वस्तूंचा उद्योग उभारणाऱ्या एका आईची गोष्ट यातून मांडण्यात आली आहे. मुलांना आई अजूनही जुन्या विचारांची वाटते त्यामुळे कसल्याही बाबतीत तिची मदत कशी घ्यायची, असा प्रश्न आजही मुलांना सतावतो. ‘सुतलियान’ या वेबमालिकेमध्ये मुलं ही कोणत्या ना कोणत्या अडचणीत सापडतात पण त्यांच्यासाठी धावून मात्र आईच येते. अडचणीच्या वेळी कुटुंबच मदतीला येतं, याची जाणीव करून देणारी आणि मुलांना पुन्हा घराशी जोडणारी अशी ही गोष्ट वेबमालिकेत रंगवण्यात आली आहे. थोडीशी हळवी, विविध घडामोंडीनी संपूर्ण आणि विनोदी शैलीत ही वेबमालिका रंगवण्यात आली असून कुटुंबासह एकत्रित वेबमालिका पाहाण्याचा आनंद यानिमित्ताने लुटता येईल. हा विषय प्रेक्षकांपर्यंत सहजरीत्या पोहोचतो. या मालिकेची निर्मिती ‘मनोर रमा प्रॉडक्शन’ने केली असून श्री नारायण सिंग यांचे दिग्दर्शन वेबमालिकेला लाभले आहे.

कलाकार –  आएशा रझा, शिव पंडित, विवान शहा, प्लाबिता बोरठाकूर.

कधी – ४ मार्चपासून प्रदर्शित  कुठे –  झी ५.