अभिनेत्री रीमा यांचे आकस्मिक निधन

पडद्यावरची ग्लॅमरस ‘माँ’

reema-lagoo
रिमा लागू

विजयाबाई मेहता यांच्या मुशीत तयार झालेली आणि रंगभूमीवर आपला अमीट ठसा उमटवणारी क लाकारांची एक फळीच निर्माण झाली होती. या फळीतही अग्रणी असलेल्या रीमा यांनी रंगभूमी, मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिका अशा सगळीकडे समर्थ अभिनयाने आणि सहज वावराने आपली छाप सोडली होती. मराठी नाटक-चित्रपटांमधील सक्षम अभिनेत्री ते बॉलीवूडच्या पडद्यावरची ग्लॅमरस ‘माँ’ अशी ओळख असलेल्या या चतुरस्र अभिनेत्रीचे बुधवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शेवटपर्यंत काम करत असलेल्या रीमा यांचे असे आकस्मिक जाणे त्यांच्या सहकलाकारांना, चाहत्यांना चटका लावून गेले. गुरुवारी दुपारी ओशिवरा येथील स्मशानभूमीत रीमा यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.

ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि करारी अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या रीमा बऱ्याच वर्षांनंतर टेलीव्हिजनवर परतल्या होत्या. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील महेश भट्ट यांच्या ‘नामकरण’ या मालिकेत त्या काम करत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. बुधवारी रात्री अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना ताबडतोब कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाची साठीही पूर्ण न झालेल्या रीमा यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी नाटय़-चित्रपटसृष्टीतील त्यांच्या सहकलाकारांना एकच धक्का बसला. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास रीमा यांचे पार्थिव त्यांच्या लोखंडवाला येथील निवासस्थानी आणण्यात आले. त्याआधीपासूनच आपल्या लाडक्या अभिनेत्रीचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी अनेक कलाकार तिथे उपस्थित झाले होते. रीमा यांच्याबरोबर सुरुवातीपासून नाटक-चित्रपटांमधून काम केलेले अभिनेता सचिन पिळगावकर, दिग्दर्शक महेश मांजरेकर, सुहास जोशी, नीना कुलकर्णी, भारती आचरेकर, इला भाटे, अनंत जोग, रमेश भाटकर, मोहन जोशी, विजू खोटे ही मंडळी सकाळपासूनच तिथे उपस्थित झाली होती. रीमा यांची कन्या मृण्मयीने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमधूनही आघाडीच्या कलाकारांबरोबर त्यांनी काम केले होते. टेलीव्हिजनवरही हिंदी आणि मराठी दोन्हीकडे त्यांचा सारखाच दबदबा होता. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम केलेले अनेक नवे-जुने कलाकार त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. १९८८ सालच्या ‘कयामत से कयामत तक’ या पहिल्याच चित्रपटात रीमा यांच्याबरोबर काम केलेल्या अभिनेता आमिर खानने पत्नी किरण रावसोबत त्यांचे अंतिम दर्शन घेतले. आमिरची पहिली पत्नी रीना दत्ताही या वेळी उपस्थित होती. रीमा यांच्या निधनाच्या धक्क्य़ातून आम्ही अजून सावरलेलो नाही. त्यांना कुठलाही आजार नव्हता. त्यामुळे त्यांच्या अशा आकस्मिक जाण्याचे मोठे दु:ख झाले आहे, अशी भावना आमिरने या वेळी व्यक्त केली. ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात काजोलच्या आईची भूमिका रीमा यांनी केली होती. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला निरोप देण्यासाठी काजोलबरोबरच अभिनेता ऋ षी कपूर, रजा मुराद, किरण खेर, राकेश बेदी अशी हिंदीतील नामवंत मंडळी या वेळी उपस्थित झाली होती. रीमा यांच्याबरोबर ‘नामकरण’ मालिकेत काम करणारी अभिनेत्री बरखा बिश्त सेनगुप्ता आणि विराफ पटेल या दोन्ही कलाकारांनी त्यांचे दर्शन घेतले. याशिवाय अच्युत पालव, विजय पाटकर, शिल्पा तुळसकर, रेणुका शहाणे, मेधा मांजरेकर, चिन्मयी सुमित, सुकन्या आणि संजय मोने, मनोज जोशी, शरद पोंक्षे, विनय येडेकर, सविता मालपेकर ही कलाकार मंडळीदेखील उपस्थित होती.

तसेच सोनाली कुलकर्णी, संजय नार्वेकर, वैभव तत्त्ववादी, अभिजित केळकर, श्रुती मराठे, नेहा पेंडसे अशा नव्या-जुन्या कलाकारांच्या मांदियाळीत अत्यंत शोकाकुल वातावरणात रीमा यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

गिरगावकर रीमा!

अगदी काही दिवसांपूर्वी ‘कट्टर गिरगावकर’ या साहित्य संघात झालेल्या कार्यक्रमात रीमा सहभागी झाल्या होत्या. आजही कट्टर गिरगावकर असलेल्या रीमा खूप छान बोलल्या. जुन्या आठवणीत रमल्या. मॅजेस्टिकचा मॅटिनी शो, ताराबागची पाणीपुरी, चाळीतील राडा आणि गणेशोत्सव यावर त्या बोलल्या.

आंबेवाडीतील चाळीत त्यांचे घर होते. अख्खी चाळ म्हणजे त्यांचे कुटुंब होते. गिरगाव सोडून अंधेरीला गेल्यावर हे सारे हरवल्याचे त्यांनी सांगितले. ‘वास्तव’ या िहदी चित्रपटातील भूमिकेचे बीज गिरगावात गवसले, असे त्या म्हणाल्या. आंबेवाडीतल्या चाळीतील शेजारच्या काकूंच्या साडय़ा त्या सेटवर न्यायच्या आणि वापरायच्या, म्हणून ‘वास्तव’चा अभिनय जिवंत झाला. चाळीतील या खंबीर बायकांनी आपल्या मुलाचा ‘रघु’ होऊ दिला नाही, असे रीमा यांनी सांगितले.

आमच्या मनात गिरगाव आणि गिरगावकरांच्या मनात आम्ही, असे म्हणत त्यांनी नमस्कार केला, तेव्हा कोणाला माहीत होते की, गिरगावची माहेरवाशीण गिरगावकरांचा अखेरचा निरोप घेतेय..

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Reema lagoo passed away