ते पैसे रेखाचे नव्हतेच- हेमा मालिनी

या थेट वक्तव्यामुळे सध्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेमा मालिनी, रेखा

बॉलिवूडमध्ये अभिनेते आणि अभिनेत्री कालांतराने राजकारण क्षेत्राकडे वळतात आणि त्यानंतर त्यांची नवी कारकीर्द सुरू होते. राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर मैत्रीचेही रंग बदलतात हे म्हणणे अनेकांना पटते. अभिनेत्री आणि मथुरेचे खासदार पद भूषविणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अभिनेत्री रेखा यांच्याबद्दल एक वक्तव्य केले. त्यांच्या या थेट वक्तव्यामुळे सध्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एकेकाळी चित्रपटसृष्टीमध्ये एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी आणि रेखा यांच्यामध्ये पैशांच्या मुद्द्यावरुन चांगलीच जुंपली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हेमा मालिनी यांनी आपल्या मतदार संघासाठी रेखा यांच्याकडून पैसे घेतल्याची माहिती हेमा मालिनी यांनी धुडकावून लावली आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी रेखा यांनी त्यांच्या फंडातून ३५ लाख रुपयांचा निधी हेमा मालिनी यांच्या मदतीसाठी देऊ केला होता. त्यानंतर रेखा यांनी एका आश्रमशाळेच्या बांधकामासाठीही १२ लाखांची वाढीव रक्कम देऊ केली होती.

‘हे खरे आहे की मथुरेतील शाळांसाठी, मी रेखा यांच्याकडून ४७ लाख रुपयांची रक्कम घेतली होती. पण रेखाचे वैय्यक्तिक पैसे नव्हते. हे पैसे खासदार फंडातून मिळणाऱ्या रक्कमेतून देण्यात आले होते. मला मिळालेल्या निधीतील जवळपास सर्व रक्कमेचा मी वापर केला होता. पण, रेखा त्यांना मिळालेल्या निधीचा वापर करत नसल्यामुळे मी त्यांच्याकडे मदत मागण्याचा विचार केला’, असे हेमा मालिनी म्हणाल्या. ‘मुलींच्या दोन शाळांच्या पुनर्विकासासाठी मी ही मदत मागण्याचे ठरवले होते’ असेही हेमा यांनी स्पष्ट केले आहे.

‘रेखा जरी माझी चांगली मैत्रीण असली तरीही तिला थेट फोन करण्याऐवजी मला तिच्या सचिवाशी संपर्क साधावा लागला होता. परिस्थितीचे गांभीर्य समजून घेत त्यानंतर रेखा यांनी मला एकूण ४७ लाखाचा निधी मदत म्हणून दिला होता’, असेही हेमा मालिनी म्हणाल्या. ‘रेखा त्यांचे स्वत:चे पैसे का देतील? जनकल्याणासाठी हे पैसे शासनातर्फेच रेखा यांना देण्यात आले होते. रेखाव्यतिरिक्त मी मथुरेतील विकासासाठी सचिन तेंडुलकरकडेही मदतीची विचारणा केली होती. पण, त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही’, असा खुलासाही हेमा मालिनी यांनी यावेळी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rekha pitches in to help girls schools in hema malinis constituency