स्मिता पाटील यांच्या स्मृतींना उजाळा: ‘रीमेंबरिंग स्मिता’!

१८ तारखेला सायंकाळी ६ वाजता डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि समीक्षक ललिता ताम्हाणे स्मिता पाटील यांच्याविषयी बोलणार आहेत.

12nfai1आपल्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपटरसिकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांचे चित्रपट पाहण्याची, तसेच त्यांच्याबरोबर काम केलेल्या व्यक्तींकडून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंबद्दल ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालया’तर्फेस्मिता पाटील यांच्या साठाव्या जन्मदिवसाच्या निमित्ताने ‘रीमेंबरिंग स्मिता’ या दोन दिवसांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘एनएफएआय’चे संचालक प्रकाश मगदूम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी हा महोत्सव होणार असून तो सर्वासाठी विनामूल्य खुला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. १९७४ मध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक अरुण खोपकर यांनी बनवलेला ‘तीव्र मध्यम’ हा वीस मिनिटांचा लघुपट उद्घाटनानंतर दाखवला जाणार आहे. तसेच, केतन मेहता यांचा ‘भवानी भवाई’ (हिंदी), मृणाल सेन यांचा ‘अकलेर सांधने’ (बंगाली) आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचा ‘जैत रे जैत’ हे चित्रपट या दिवशी रसिकांना बघायला मिळणार आहेत. रविवारी सागर सरहदी यांचा ‘बाजार’ (हिंदी), उत्पलेंदू चक्रवर्ती यांचा ‘देवशिषू’ (हिंदी), कुमार सहानी यांचा ‘तरंग’ आणि जी. अरविंदन यांचा ‘चिदंबरम’ हे चित्रपट पाहायला मिळतील. यातील ‘अकलेर सांधने’, ‘जैत रे जैत’ आणि ‘चिदंबरम’ या चित्रपटांचे ‘एनएफएआय’ ने जतन केले आहे.
१८ तारखेला (रविवारी) सायंकाळी ६ वाजता डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि समीक्षक ललिता ताम्हाणे स्मिता पाटील यांच्याविषयी बोलणार आहेत.

६० फ्रेंच चित्रपट मिळाले!  
भारतातील फ्रेंच दूतावासातर्फे ‘एनएफएआय’ला ६० फ्रेंच चित्रपट मिळाले आहेत. १९४६ ते २०११ या कालावधीतील हे चित्रपट असून त्यातील एक चित्रपट १६ एमएम स्वरुपात, एक डीव्हीडी स्वरुपात व इतर ५८ चित्रपट ३५ एमएम स्वरुपात आहेत. या चित्रपटांमध्ये अनेक महत्त्वाच्या चित्रपटांचा समावेश आहे. ज्येष्ठ दिग्दर्शका मीरा नायर यांनी त्यांचा ‘मिसिसिपी मसाला’ हा चित्रपट नुकताच ‘एनएफएआय’ला दिल्याचेही मकदूम यांनी सांगितले.

‘एनएफएआय’ आता ट्विटरवरही!
‘एनएफएआय’च्या फेसबुक पानाला रसिकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून संग्रहालय आता ‘एनएफएआय ऑफिशियल’ या नावाने सोमवारपासून ट्विटरवरही आले असल्याचेही मकदूम म्हणाले. फेसबुकवरही संस्था ‘एनएफएआय ऑफिशियल’ याच नावाने असून दिवसात २ ते ३ वेळा पान अपडेट होत असल्याचे ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Remembering smita patil