मराठी सिनेसृष्टीत आशालता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे करोनामुळे सातारा येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. आशालता यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री रेणुका शहाणेंनी ट्विट करत आशालतांना श्रद्धांजली वाहिली.

‘आज फार हतबल झालेय. कोविडने एका अत्यंत सुंदर जिवाचा बळी घेतला. आशालता ताई अनंतात विलीन झाल्या. अत्यंत मायाळू, प्रेमळ, संवेदनशील, उत्तम कलाकार. मला नेहमीच बाळा म्हणत आशीर्वाद देणाऱ्या आशालता ताईंच्या आत्म्याला शांती लाभो’, अशा शब्दांत रेणुका यांनी भावना व्यक्त केल्या.

आशालता या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या शूटिंगसाठी साताऱ्यात आल्या होत्या. याच ठिकाणी त्यांना करोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

आशालतांनी आतापर्यंत मराठी आणि हिंदी अशा सुमारे १०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘उंबरठा’, ‘सूत्रधार’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘वहिनीची माया’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. त्या मूळच्या गोव्याच्या असून त्यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली.