रेणुका शहाणे व आशुतोष राणा यांच्या लग्नाला दोन दशकांहून अधिक काळ झाला आहे. पण आशुतोष राणा यांच्याशी लग्न करण्यापूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. रेणुका यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांच्या पहिल्या लग्नाचा आणि घटस्फोटाचा त्यांच्या नात्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर परिणाम झाला. रेणुका यांचं यापूर्वी मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय दिग्दर्शक विजय केंकरे यांच्यासह लग्न झालं होतं. मात्र, काही काळानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
पिंकविलाला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत रेणुका यांनी विजय केंकरे यांच्याबरोबर झालेल्या घटस्फोटाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या की, त्यांचं आणि विजय यांचं नातं लग्नाच्या रूपात यशस्वी ठरलं नसलं तरी दोघेही चांगले व्यक्ती होते. या अनुभवामुळे पुढे आशुतोष राणा यांच्या प्रेमात पडल्यानंतर नात्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अधिक वास्तववादी झाला. पहिलं लग्न आणि त्यानंतर झालेल्या घटस्फोटाबद्दल बोलताना रेणुका म्हणाल्या की, त्यांना हे नातं टिकावं अशी वाटत होतं.
आमचं नातं टिकू शकलं नाही – रेणुका शहाणे
रेणुका घटस्फोटाबद्दल म्हणाल्या, “हो, नक्कीच घटस्फोटाचा माझ्यावर परिणाम झाला, कारण प्रत्येकाला आपलं नातं टिकावं असंच वाटतं आणि याच कारणासाठी मला लवकर लग्न करायचं होतं. मात्र, ते नातं टिकू शकलं नाही. आम्ही दोघेही खूप चांगले व्यक्ती होतो, पण दुर्दैवाने पती-पत्नी म्हणून आमचं नातं टिकू शकलं नाही. त्यामुळे शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने वेगळं होणं आणि या अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करणं, हीच योग्य गोष्ट आहे.”

रेणुका यांचे पहिले पती विजय केंकरे हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. आपल्या या नात्याकडे मागे वळून पाहताना रेणुका यांनी काय चुकलं याचा विचार करत राहण्याऐवजी या अनुभवातून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवला. घटस्फोटानंतर लग्नाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बराच बदलला, असं रेणुका यांनी सांगितलं. आशुतोष राणा यांच्या प्रेमात पडल्यानंतर त्या लग्नाकडे पूर्वीसारख्या आदर्शवादी दृष्टिकोनातून पाहत नव्हत्या.
त्या म्हणाल्या, “मला वाटतं की या अनुभवातून मला खूप काही मिळालं. कारण खूप मोठ्या कालावधीनंतर जेव्हा मी आशुतोष राणा यांच्या प्रेमात पडले, तेव्हा लग्नाबद्दलचा माझा दृष्टिकोन नक्कीच पूर्वीसारखा नव्हता. तो अधिक वास्तववादी झाला होता. त्यामुळे नात्यात येणारे अनेक चढ-उतार मी अधिक सहजपणे हाताळू शकले. त्यात माझी परिपक्वताही कारणीभूत होती. माझं लग्न झालं तेव्हा माझं वय ३४ किंवा ३५ वर्षे होतं. भारतात लग्न करण्यासाठी हेही बरंच मोठं वय आहे”.
रेणुका यांच्या मते, पहिल्या लग्नातून मिळालेला अनुभव आणि वयाबरोबर आलेली परिपक्वता या दोन्ही गोष्टींमुळे दुसऱ्या लग्नानंतरच्या आव्हानांना सामोरं जाणं त्यांच्यासाठी सोपं झालं.
