अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. तसंच तपासकार्यात देखील रियाविषयी अनेक गोष्टी समोर येत आहेत.मात्र आता या सगळ्यावर रियाने मौन सोडलं आहे. ‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत रियाने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यात युरोप ट्रीपला जाण्याविषयी तिने वक्तव्य केलं आहे. विमानात बसताना सुशांतला भीती वाटायची त्यामुळे तो काही औषधं घ्यायचा असं तिने सांगितलं आहे.

सुशांत विमानात बसण्यापूर्वी मोडाफिनिल नावाचं एक औषध घ्यायचा आणि प्रत्येक वेळी हे औषध तो प्रत्येक वेळी जवळ बाळगायचा. त्यामुळे तो कधीच औषधं घेण्यापूर्वी कोणाशी सल्लामसलत करत नव्हता.

“आम्ही पॅरिसला पोहोचल्यानंतर जवळपास तीन दिवस तो त्याच्या रूममधून बाहेर आला नव्हता. खरं तर पॅरिसला जाण्यापूर्वी तो फार उत्साही होता. तो त्याच्या वेगळ्याच अंदाजात होता. मात्र पॅरिसला गेल्यावर तो त्याच्या खोलीतून बाहेर आलाच नाही. तसंच जेव्हा स्वित्झर्लंडला गेल्यावरही तो आनंदी होता. परंतु, ज्यावेळी आम्ही इटलीला पोहोचलो त्यावेळी आम्हाला जी रूम देण्यात आली होती तिची रचना अत्यंत विचित्र होती. मला ती रुम पाहूनच भीती वाटत होती. सुशांतला पहिली ती रुम व्यवस्थित वाटली. मात्र नंतर तिथे काहीतरी आहे असं सुशांतला जाणवलं त्याने मला ते सांगितलं सुद्धा. पण एक वाईट स्वप्न असेल असं मी त्याला म्हणाले. परंतु त्या दिवसानंतर त्याच्यात बदल झाला आणि तो बाहेर पडलाच नाही”, असं रियाने सांगितलं.

पुढे ती म्हणते, “२०१३ नंतर सुशांतमध्ये बरेच बदल झाले होते. तो नैराश्यात गेला होता त्यामुळे त्याने मनोविकारतज्ज्ञ हरेश शेट्टी यांच्याकडे ट्रिटमेंट घेत होता. त्यावेळी नेमकं काय सुरु आहे असं मी सुशांतला विचारलं त्यावेळी त्याने २०१३ नंतर त्याला नैराश्य आल्याचं सांगितलं. तसंच त्यामुळे त्याने युरोप ट्रिपदेखील लवकर आटोपली होती”.

दरम्यान, या मुलाखतीत रियाने अनेक गोष्टींचा खुलासा केला. सुशांत आणि शोविक यांच्यात चांगली मैत्री होती असंही तिने सांगितलं. तसंच सुशांतच्या घरातल्यांनी रियावर जे आरोप केले त्यावरही ती व्यक्त झाल्याचं पाहायला मिळालं.