अभिनेता सुशांतसिंह राजपूतला डॉक्टरांच्या बनावट चिठ्ठीच्या आधारे औषधे दिल्याच्या आरोपाप्रकरणी त्याच्या बहिणी प्रियांका व मीतू सिंह यांच्याविरोधात दाखल गुन्हा रद्द करू नये, अशी मागणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने मंगळवारी उच्च न्यायालयात केली.
दोघींवर ठेवण्यात आलेला आरोप गंभीर स्वरूपाचा असून त्यांची याचिका फेटाळण्याचीही मागणी रियाने केली. तर मुंबई पोलीस आणि सीबीआयने प्रियांका आणि मीतू यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यास वेळ मागून घेतला.
रियानेच प्रियांका आणि मीतू यांच्यासह दिल्लीस्थित राममनोहर लोहिया रुग्णालयातील डॉ. तरुण कुमार यांच्याविरोधात वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तो रद्द करण्याच्या मागणीसाठी दोघींनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करत प्रियांका आणि मीतू यांच्या याचिकेला विरोध केला.
प्रियांका आणि मीतूविरोधात दाखल गुन्ह्यचा तपास अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आरोपांचा तपास करण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ देण्याची आवश्यकता आहे, असेही रियाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ज्या औषधांवर बंदी आहे ती औषधे प्रियांका आणि मीतू यांच्या सांगण्यावरून दिल्लीस्थित डॉक्टरने सुशांतला दिली होती. ही औषधे मिळाल्यावर पाचव्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला. त्यामुळे ही औषधे सुशांतने घेतली होती का, या औषधांमुळे त्याचा मृत्यू झाला का, त्यामुळे त्याची मानसिक स्थिती आणखी बिघडली या सगळ्यांचा तपास होणे गरजेचे आहे. त्यामुळेच प्रियांका आणि मीतू यांची गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळून लावा, अशी मागणी रियाने केली आहे.
सुशांतचे त्याच्या कुटुंबीयांचे सलोख्याचे सबंध नव्हते. त्यामुळे त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती आणि तो त्यासाठी उपचारही घेत होता. सुशांतने तीन मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेतले. हे उपचार सुरू असेपर्यंत तो ठीक होता. परंतु जानेवारी महिन्यात तो कुटुंबीयांना भेटायला गेला होता. परतल्यावर त्याने उपचार बंद केल्याचे सांगितले. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या टाळेबंदीच्या सुरुवातीच्या दिवसांत सुशांत ठीक होता. मात्र हळूहळू त्याची मानसिक स्थिती बिघडू लागली. अभिनेता ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्या मृत्यूचाही त्याच्या मानसिक स्थितीवर आघात झाला होता. त्यामुळे त्यांना उपचार घेण्यास नकार दिला. त्याही वेळी तो अमलीपदार्थांचे सेवन करत होता, असा दावाही रियाने प्रतिज्ञापत्रात केला आहे.