गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत. ही जोडी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्यामुळे अनेकदा रिचा अलीसोबतचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसंच ती अनेकदा त्यांच्या नात्यावर उघडपणे व्यक्तही होत असते. अलिकडेच रिचाने तिच्या आणि अलीच्या रिलेशनविषयी भाष्य केलं आहे. यावेळी बोलत असताना आमचं नातं तनिष्कच्या त्या जाहिरातीसारखं आहे, असं ती म्हणाली आहे. एका मुलाखतीत ती बोलत होती.
“माझं आयुष्य त्या जाहिरातीसारखं झालं आहे. मला अलीच्या कुटुंबीयांनी भरभरून प्रेम दिलं. तसंच माझ्या कुटुंबीयांनी अलीला स्वीकारलं. मात्र ज्या लोकांना दुसऱ्यांच्या वैवाहिक आयुष्यात हस्तक्षेप करण्याची सवय असते, जे लोक कायम प्रेमाचा तिरस्कार करतात अशा लोकांचा विचार करुन मला खरंच फार वाईट वाटतं”, असं रिचा म्हणाली.
दरम्यान, अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते. अखेर येत्या जून किंवा जुलै महिन्यात ते लग्न करणार आहेत. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘फुकरे’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची पहिली भेट झाली होती. तेव्हापासूनच दोघांच्या रिलेशनशिपबाबतच्या चर्चा रंगू लागल्या होता. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होणारे त्यांचे फोटो आणि व्हिडीओजमुळे तर या चर्चांना आणखी उधाण आले. परंतु या चर्चा केवळ अफवा नव्हत्या हे आता सिद्ध झाले आहे.