Riddhima Kapoor Bollywood debut : बॉलीवूडमधील अभिनयाचा वारसा जपणारे कुटुंब म्हणून कपूर घराणे मानले जाते. सिनेविश्वात कपूर कुटुंबाच्या चार पिढ्या प्रभावशाली आणि यशस्वी करिअर घडवत आहेत. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास राज कपूर, शम्मी कपूर व शशी कपूर यांनी यशस्वीरीत्या सांभाळला. त्यानंतर रणधीर, राजीव व ऋषी कपूर यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. तर करिश्मा कपूर, करीना कपूर व रणबीर कपूर यांनी तर बॉलीवूडचा काळ गाजवला आणि आजही त्यांची जादू कायम आहे. नुकतीच कपूर घराण्यात सामील झालेली आलिया भट्ट यशाच्या शिखरावर आहे. अशातच आता आणखी एक कपूर बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण करणार आहे आणि ती म्हणजे रिद्धिमा कपूर.
वयाच्या ४५ व्या वर्षी ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची कन्या रिद्धिमा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. टीव्ही आणि ओटीटी शोमध्ये सामील झाल्यामुळे चर्चेत आलेली रिद्धिमा आता सिनेविश्व गाजवण्यास सज्ज झाली आहे. ‘दादी की शादी’ या चित्रपटातून रिद्धिमा पदार्पण करणार आहे. वडिलांच्या विरोधामुळे चंदेरी दुनियेपासून दूर राहिलेली रिद्धिमा आता दमदार पदार्पण करणार आहे. रिद्धिमासह तिची मुलगी समारादेखील पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार असल्याने या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनेकदा स्त्री कलाकार लग्नानंतर अभिनयाचे क्षेत्र सोडून कुटुंबाला प्राधान्य देत करिअर सोडून देतात. मात्र, रिद्धिमाने चाळिशीनंतर चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. रिद्धिमा ही कपूर घराण्यातील बॉलीवूडमध्ये सर्वांत उशिरा पदार्पण करणारी अभिनेत्री ठरणार आहे. कपूर घराण्यातील असूनही तिने चित्रपटांमध्ये काम का केले नाही याचे कारण ऋषी कपूर यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकात सांगितले आहे. नीतू कपूर यांनी लिहिले आहे की, “रिद्धिमाला माहीत होतं की तिने अभिनेत्री व्हायचं ठरवलं तर तिचे वडील आत्महत्या करतील.” ऋषी कपूर आपल्या पत्नी आणि मुलीबद्दल प्रचंड ओव्हर प्रोटेक्टिव्ह होते. रिद्धिमामध्ये उत्तम अभिनय कौशल्य आणि सौंदर्याची खाण असूनही केवळ वडिलांच्या नाराजीपोटी ती ज्वेलरी आणि फॅशन डिझायनिंगकडे वळाली, असे नीतू कपूर यांनी लिहिले आहे.
ओटीटी आणि टीव्ही शोमुळे आली चर्चेत
नीतू कपूर आणि रणबीर कपूरसोबत कपिल शर्मा शोमध्ये सामील झाल्यानंतर रिद्धिमा कपूर चर्चेमध्ये आली. कपूर घराण्याचे एक तेज तिच्यामध्ये दिसून आल्याने प्रेक्षकांमध्ये तिची चर्चा सुरू झाली. नेटफ्लिक्सवरील फॅब्युलस लाइव्ह्स vs बॉलीवूड वाइव्ह्स सीझन ३ मध्येही रिद्धिमाने आपले वेगळेपण दाखवून दिले होते. बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत असलेल्या रिद्धिमाने SCREEN ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा भावनिक क्षण असल्याचे म्हणत ऋषी कपूर यांचे आशीर्वाद असल्याचे सांगितले.
नव्या प्रवासासाठी रिद्धिमा कपूर सज्ज
त्यावेळी रिद्धिमाने, “हे खरोखरच एखाद्या स्वप्नासारखे वाटत आहे. सर्व काही पुन्हा मूळ पदावर येऊन एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. मला खात्री आहे की, माझे वडील (ऋषी कपूर) सदैव माझ्या पाठीशी आहेत. मी हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असतात. याच विचारातूनच मला प्रेरणा मिळते. आयुष्याच्या या टप्प्यावर एका पूर्णपणे नवीन विश्वात पाऊल टाकणे, हे माझ्यासमोर सर्वांत मोठे आव्हान होते. कोणतीही नवी सुरुवात करण्यात एक प्रकारची असुरक्षितता असते; पण त्याच वेळी त्याबद्दल प्रचंड उत्साहही वाटत असतो,” अशा भावना व्यक्त केल्या.
‘दादी की शादी’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
‘दादी की शादी’ हा हिंदी कौटुंबिक विनोदी चित्रपट शुक्रवारी (८ मे) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विधवा आजीच्या पुनर्विवाहाची कथा रंगवण्यात आली आहे. रिद्धिमा कपूर साहनी चित्रपटातून पदार्पण करीत असून, त्यामध्ये नीतू कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर खास विनोदी शैलीमध्ये कपिल शर्मा नातवाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
