अजय देवगणच्या बहुचर्चित ‘सिंघम रिटर्न्स’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला काही काळ उरलेला असतानाच या चित्रपटाभोवती वादाचे वादळ घोंगावू लागले आहे. ‘सिंघम रिटर्न्स’ हा अजय देवगण आणि रोहित शेट्टी जोडीच्या ‘सिंघम’ चित्रपटाचा सिक्वेल असून, या चित्रपटाच्या प्रोमोजना चित्रपट रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु यात दर्शविण्यात आलेल्या हिंदू साधूच्या खलनायकी रुपावरून आणि चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारत असलेल्या अजय देवगणद्वारा त्यांना करण्यात येणाऱ्या मारहाणीच्या भाषेवरून ‘हिंदू जनजागृती समिती’ने आक्षेप नोंदविला आहे. समितीने सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटावर बंदी आणण्याची मागणीदेखील केली आहे. या विषयी बोलताना समितीचे सचिव रमेश शिंदे म्हणाले, चित्रपटातील या दृष्यामुळे हिंदू साधू-संतांचा अपमान होत असून, समाजात हिंदू धर्माबाबत चूकीचा संदेश जाऊ शकतो. एकीकडे हिंदू साधूंना मारण्याची भाषा करणारा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अजय दुसरीकडे पोलिसांच्या गणवेषात मशिदीत नमाज पडताना आणि मौलवींना सलाम करताना चित्रपटात दर्शविला आहे. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याचे देखील ते म्हणाले. चित्रपटातील आक्षेपार्ह दृष्ये वगळली नाहीत, तर हा चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याचा इशारा हिंदू जनजागृती समितीतर्फे देण्यात आला आहे.