आषाढी एकादशी जवळ आली की, भक्तांना ओढ लागते ती पंढरपूरच्या वारीची. विठ्ठलाला भेटण्यासाठी अनेक भक्त पायी पायी पंढरपूरच्या दिशेने निघतात. भक्ती अन् भजनांमध्ये दंग होत विठुनामाचा गजर करत करत पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. अशातच अभिनेत्री रिंकू राजगुरूचं विठुरायाच्या वारीचं एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. काही दिवसांपूर्वी रिंकूचे पंढरीच्या वारीमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याच गाण्याच्या शूटिंगदरम्यानचे ते फोटो होते.

सारेगम मराठीच्या आगामी वारी स्पेशल गाण्यात रिंकूचा एक नवा अंदाज अनुभवायला मिळणार आहे. “बाप विठुराया” अस या गाण्याचं नाव असून अजय गोगावले यांच्या दमदार आवाजात हे गाणं संगीतबद्ध करण्यात आलं आहे. अजय गोगावले यांच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना पुन्हा एकदा बाप विठुराया गाण्यातून अनुभवायला मिळणार आहे.

या गाण्याबद्दल बोलताना रिंकू सांगते, “मला खूप आनंद होतोय की, माझं पहिलं अल्बम गाणं हे विठ्ठलावर, पंढरीच्या वारीवर चित्रीत झालंय. कारण, माझं माझ्या विठुरायावर प्रचंड प्रेम आणि श्रद्धा आहे. तो माझ्या प्रत्येक गोष्टीत माझ्या बरोबर असतो… मी विठुरायाशी खूप गप्पाही मारते. विठ्ठल हा माझ्या आयुष्यातला एक हळवा भाग आहे. त्यामुळे हे गाणं करताना मला असं वाटलं की, त्याच्या मनात असावं म्हणून हे सगळं जुळून आलंय. कारण, आजवर मी कधीच अल्बम Song केलं नव्हतं.. कारण, माझी कामाची पद्धत जरा वेगळी आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे हे गाणं अजय गोगावले यांनी गायलं आहे आणि यानिमित्ताने फार वर्षांनी पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर काम करता आलं. सारेगमबरोबरही पुन्हा एकदा काम करता आलं याचाही मला खूप आनंद आहे. माझं पहिलं अल्बम Song असल्याने हे माझ्यासाठी खूप खास आणि जवळचं आहे आणि मी आशा करते की हे गाणं प्रेक्षकांनाही तितकंच आवडेल.”

रिंकूचा कधीही न पाहिलेला…काहीसा वेगळा पण, तितकाच लक्षवेधी लूक या गाण्यातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण पहिल्या वहिल्या अल्बम गाण्यासाठी रिंकू देखील तितकीच उत्सुक आहे.

दरम्यान, हे गाणं प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी रिंकूचं विशेषत: तिच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं आहे. “रिंकूचा अभिनय अतिशय सुरेख आणि गीत सुद्धा तितकंच भावपूर्ण”, “खूप छान…अंगावर काटा आला”, “अप्रतिम सादरीकरण”, “एक नंबर रिंकू खरंच सुंदर काम केलंय.” नेटकऱ्यांच्या अशा असंख्य प्रतिक्रिया या म्युझिक व्हिडीओवर आल्या आहेत.