Trisha Krishnan Reveals the Real Reason Behind Her Broken Engagement : त्रिशा कृष्णन दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतु, सध्या त्रिशा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपतीची पत्नी संगीता यांनी घटस्फोटासाठी कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर विजयचे त्रिशाबरोबर विवाहबाह्य संबंध आहेत अशा चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर दोघे एकत्र एका लग्नातही गेले होते. त्यानंतर या चर्चेला अजूनच उधाण आलं.

विजयची पत्नी संगीता यांनी घटस्फोटासाठी याचिका दाखल करताना विजयचे लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे, ज्यानंतर सर्वांच्या नजरा त्रिशाकडे वळल्या. परंतु, अद्याप या तिघांपैकी कोणीही याबद्दल कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. विजय पूर्वी दाक्षिणात्य अभिनेता राणा डगुबट्टीबरोबरही त्रिशाचं नाव जोडलं गेलं होतं. पण, तुम्हाला माहीत आहे का, यापूर्वीसुद्धा त्रिशा तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली होती.

त्रिशा आता जरी सिंगल असली तरी पूर्वी तिचा साखरपुडा झालेला आणि अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार होती. परंतु, नवीन प्रवास सुरू होण्याआधीच तिनं त्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी नेमकं काय झालेलं आणि अभिनेत्रीनं साखरपुडा का मोडलेला याबद्दल तिनं एका मुलाखतीत सांगितलेलं. त्रिशा नेमकं काय म्हणालेली याबद्दल जाणून घेऊयात…

साखरपुडा मोडल्यानंतर त्रिशाने केलेलं ट्विट

त्रिशाचा चेन्नईतील उद्योगपती वरुण मणियनसह साखरपुडा झालेला. पण, नंतर साखरपुडा मोडण्यात आला आणि त्रिशानं यामागचं कारणही सांगितलेलं. ‘फर्स्ट स्पॉट’च्या वृत्तानुसार एक दशकभरापूर्वी त्रिशानं ट्विट करत याबद्दल सांगितलेलं. अभिनेत्री म्हणालेली, “सर्वत्र सुरू असलेल्या हजारो तर्क-वितर्कांची मला गंमत वाटते. लोकांनो, आता हे इथेच थांबू द्या, मी आनंदी आहे, सिंगल आहे आणि कृतज्ञ आहे.”

‘या’ कारणामुळे मोडलेला साखरपुडा

उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार त्रिशानं याबद्दल एका मुलाखतीतही सांगितलं होतं. अभिनेत्री मोडलेल्या साखरपुड्याबद्दल म्हणालेली, “ज्या व्यक्तीशी माझं लग्न होणार होतं, त्यानं मला अभिनय सोडायला सांगितलेला. चित्रपटात काम करणं थांबवण्यापेक्षा मी साखरपुडाच मोडला. मी फक्त तेव्हाच ब्रेक घेईन, जेव्हा मी गरोदर असेन. जर मला मुख्य भूमिकांसाठी विचारणा झाली नाही, तर मी माझ्या व्यक्तिरेखेला साजेशा इतर भूमिका करेन; पण फिल्म इंडस्ट्री सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची माझी इच्छा आहे.”

दरम्यान, त्रिशा दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसह स्क्रीन शेअर केली आहे. तिनं दाक्षिणात्य चित्रपटांव्यतिरिक्त बॉलीवूड चित्रपटातही काम केलं आहे.