Watch These Low Budget South Films : हिट चित्रपट बनवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले असतील असं काही नसतं. असे काही दाक्षिणात्य चित्रपट आहेत, ज्यांचं बजेट कमी असतानाही त्यांनी मोठ मोठ्या कलाकारांच्या चित्रपटांनाही मागे सोडलं. या कमी बजेट असलेल्या चित्रपटांनी फक्त प्रेक्षकांची मनं जिंकली नाही तर बॉक्स ऑफिसवरही बरेच रेकॉर्ड मोडले.
लोकांना अनेकदा असं वाटतं की, चित्रपट हिट होण्यासाठी त्याचं बजेटही मोठं असायला हवं. पण, दाक्षिणात्य इंडस्ट्रीने जर कथानक चांगलं असेल तर कमी बजेटचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू शकतात हे सिद्ध केलं आहे आणि अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. यामध्ये ‘कांतारा’ ते ‘लोकाह’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
कमी बजेटमध्ये बनलेल्या ‘या’ चित्रपटांनी केलेली कोट्यवधींची कमाई
कांतारा – २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने प्रदर्शित होताच लोकांना चकित केलं. कर्नाटक येथील तटीयठिकाणी बनलेल्या या चित्रपटाने लोककला, परंपरा, प्रकृती आणि मानवी लालच या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. १६ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ‘एबीपी’च्या वृत्तानुसार जगभरात ३९७ कोटींचा गल्ला जमावला.
कार्तिकेय २ – २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला हा एक मायथोलॉजिकल चित्रपट आहे, ज्यामध्ये भगवान कृष्णाशी जोडलेलं रहस्य पाहायला मिळतं. प्रदर्शित झाल्यानंतर देशभरात या चित्रपटाबद्दल मोठ्या प्रामाणात चर्चा झालेली आणि या चित्रपटाने उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार ११० कोटींची कमाई केलेली.
लोकाह चॅप्टर १ – २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची निर्मिती लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता दुल्कर सलमानने केली आहे. ३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार ३०० कोटींची कमाई करणारा पहिला मल्याळम चित्रपट ठरला.
हनुमान – २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हनुमान’ या चित्रपटात तेज सज्जा हा अभिनेता झळकलेला. दमदार व्हीएफएक्स, उत्कृष्ट कथानक आणि क्लायमॅक्समुळे या चित्रपटाने २९६ कोटींचा गल्ला जमावला. हा चित्रपटही कमी बजेटमध्ये बनलेला.
प्रेमालू – २०२४ मध्ये आलेला हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाने तरुण पिढीची मनं जिंकली. पहिली नोकरी, प्रेम आणि स्वातंत्र्य या गोष्टींना हलक्या फुलक्या अंदाजात या चित्रपटातून दाखवण्यात आलं. या चित्रपटाने १३६ कोटींची कमाई केली.
मंजुम्मेल बॉयच – २०२४ मध्ये आलेला हा चित्रपट मैत्री आणि गरिबी यावर आधारित आहे. हा एक भावनिक चित्रपट आहे. या चित्रपटाने २४२ कोटींची कमाई केली आणि हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या मल्याळम चित्रपटांपैकी एक ठरला.
सु फ्रॉम सो – २०२५ मध्ये आलेला एक अतिशय साधा पण मन जिंकणारा चित्रपट आहे. गाव, अफवा आणि निरागस प्रेमावर बनलेल्या या चित्रपटाचं अनेकांकडून कौतूक झालं आणि या चित्रपटाने १२० कोटींची कमाई केली.

