scorecardresearch

Kantara 2 Update : ‘कांतारा २’च्या कथानकाबद्दल रिषभ शेट्टीचा मोठा खुलासा; केव्हा होणार पुढील भाग प्रदर्शित?

‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर ४५० कोटी एवढी कमाई केली

kantara rishab shetty
फोटो : इंडियन एक्सप्रेस

Kantara 2 Update : २०२२ हे वर्षं कन्नड चित्रपटसृष्टीसाठी खास होतं. ‘केजीएफ २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला अन् पाठोपाठ आलेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाने रेकॉर्ड मोडून एक वेगळाच इतिहास रचला. सुरुवातीला फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला नंतर हिंदी आणि इतर भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आलं. या चित्रपटामुळे रिषभ शेट्टी रातोरात स्टार झाला. जानेवारी महिन्यात ‘कांतारा’ने चित्रपटगृहात १०० दिवस पूर्ण केले.

अभिनेता दिग्दर्शक रिषभ शेट्टी आणि होमबाले फिल्म्सचे संस्थापक विजय किरगंदूर यांनी यानिमित्त जंगी सेलिब्रेशन केलं. यादरम्यान रिषभ शेट्टीने ‘कांतारा २’बद्दल भाष्य केलं. ‘कांतारा २’ हा मूळ चित्रपटाचा प्रीक्वल असणार आहे असं रिषभने नमूद केलं. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा : ‘वाळवी २’ येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांची मोठी घोषणा

याबद्दल रिषभ म्हणाला, “तुम्ही आत्ता जे पाहिलं तो दूसरा भाग होता. या चित्रपटाचा प्रीक्वल म्हणजेच भाग १ पुढील वर्षी येणार आहे. कांताराचं चित्रीकरण करतानाच माझ्या डोक्यात याचा विचार आला होता, कारण या कथानकाचा इतिहास फार मोठा आहे. सध्या आम्ही या चित्रपटाच्या कथानकासाठी अधिक मेहनत घेत आहोत. आत्ता याबद्दल जास्त सांगता येणं कठीण आहे.”

‘कांतारा’ हा फक्त १६ कोटीच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे, पण याला मिळालेलं यश आणि प्रेक्षकांच्या प्रतिसाद बघता याच्या प्रीक्वलसाठी जास्त बजेटसह हा चित्रपत आणखी भव्य पद्धतीने सादर करणार असल्याची चर्चा होत आहे. रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर ४५० कोटी एवढी कमाई केली. आता पुढील वर्षी येणाऱ्या ‘कांतारा २’साठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 09:52 IST
ताज्या बातम्या