Riteish Deshmukh Memories with Asha Bhosle : आशा भोसले यांच्या निधनानंतर केवळ संगीत विश्वच नाही, तर संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत दु:खाचे वातावरण आहे. अनेक कलाकारांनी आपल्या लाडक्या ‘आशा ताईंना’ भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता रितेश देशमुखने तर त्यांच्याशी असलेल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख करत त्यांना ‘आई’ अशी साद घातली आहे. आशा भोसलेंच्या निधनाने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अभिनेता रितेश देशमुख यानेही आशाताईंच्या आठवणीत एक भावुक पोस्ट केली आहे.

रितेश देशमुखने आशा भोसलेंचे काही फोटो पोस्ट केले आहेत. तसेच एक फोटो त्याचा व आशाताईंचा आहे. हे फोसोट पोस्ट करत त्याने आशाताई त्याच्या कामाचं कौतुक करायला फोन करायच्या, एकदा तर त्यांनी रितेशचा आवडता पदार्थ बनवून त्याला घरी जेवायला बोलावलं होतं, ती आठवणही त्याने सांगितली.

रितेश देशमुखची आशा भोसलेंबद्दल पोस्ट

“आशा ताई – (मी त्यांना प्रेमाने ‘आई’ म्हणायचो) – एक असं व्यक्तिमत्त्व होतं की, ज्यांच्या सहवासातून बाहेर पडल्यावरही त्यांची ऊब आणि प्रेम कायम जाणवत राहायचं. त्यांना अनेकदा भेटण्याचं भाग्य मला लाभलं आणि प्रत्येक वेळी मला आपल्या घरी आल्यासारखं वाटायचं. त्या खूप प्रेमळ आणि शांतपणे प्रेम व्यक्त करणाऱ्या होत्या. माझ्या मनाच्या अत्यंत जवळ असलेली एक आठवण म्हणजे, ज्या दिवशी त्यांनी स्वतःच्या हाताने माझा आवडता पदार्थ बनवला आणि मला जेवायला बोलावलं. त्यांच्याबरोबर टेबलावर बसून जेवताना मला खरोखर सन्मानित झाल्यासारखं वाटलं आणि आपुलकी वाटली.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे अचानक येणारे फोन — जेव्हा कधी त्यांना माझं काम चांगलं वाटायचं, तेव्हा त्या मला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःहून फोन करायच्या.
आई, तुमच्या प्रेमासाठी आणि मला खास असल्याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचं प्रेम आणि तुमचा आवाज मी माझ्या हृदयात सदैव जपून ठेवेन.
तुमच्या आत्म्यास शांती लाभो,” असं रितेश देशमुखने लिहिलं.

आशा भोसले यांना मिळालेले पुरस्कार

आशा भोसले यांनी आपल्या करिअरमध्ये हजारो गाणी गायली. त्यांना अनेक पुरस्काराने गौरवही करण्यात आला. भारत सरकारकडून दिला जाणारा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे पद्मविभूषण पुरस्कारने २००८ साली त्यांना गौरवण्यात आलं होतं. तसेच २००० साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. २०२१ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता.

आशा भोसलेंना दोनदा ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यातला पहिला ‘उमराव जान’ मधील दिल चीज क्या है यासाठी तर दुसरा ‘इजाजत’ चित्रपटातील ‘मेरा कुछ सामान’ या गाण्यासाठी. आशा ताईंनी एकूण ७ वेळा फिल्मफेअरचे ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ पुरस्कार जिंकले होते. २००१ मध्ये त्यांना फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. संगीत इतिहासात सर्वाधिक गाणी (स्टुडिओ रेकॉर्डिंग) रेकॉर्ड करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला होता. त्यांना विविध विद्यापीठांकडून ‘डॉक्टरेट’ (मानद पदवी) देऊन सन्मानित करण्यात आले होते.