रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख अशा कलाकारांपैकी एक आहेत जे कायमच त्यांच्या आजुबाजूला घडणाऱ्या घडामोडींबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया ठामपणे व्यक्त करत असतात. अशातच आता सध्या देशात सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबद्दलही या दोघांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिजीत दिपके स्थापित कॉक्रोच जनता पार्टी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करत आहेत. २० जुलै रोजी सोमवारी दिल्लीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आणि इतर नागरिकांनीसुद्धा हजेरी लावत या आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र काल दिल्ली पोलिसांकडून यादरम्यान आंदोलनकरत्यांवर लाठी चार्ज करण्यात आला. एकंदरीतच दिवसभरात अनेक घटना घडल्या. अशातच आता या सर्व प्रकाराबद्दल रितेश व जिनिलीया यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणाले रितेश व जिनिलीया?
एक्सवर पोस्ट शेअर करत रितेशने आम्ही देशातील तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्यांचा आवाज ऐकला पाहिजे. तेच आपल्या देशाचं भविष्य आहे. असं म्हटलं आहे. रितेश व जिनिलीया देशमुख यांनी या पोस्टमधून म्हटलंय की, “आम्ही देशातील तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्यांचा आवाज कोणाचीही भीती न बाळगता ऐकला गेला पाहिजे. तरुण ही आपल्या लोकशाहीची ताकद आणि देशाच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांचे विचार ऐकूया, त्यांना साथ देऊया आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देऊया. तरुणांची ऊर्जा, धैर्य आणि स्वप्नंच आपल्याला अभिमान वाटेल असा भारत घडवू शकते.”
We stand in solidarity with the youth of our country.
— Riteish Deshmukh (@Riteishd) July 20, 2026
Their voices deserve to be heard — loud, clear, and without fear. They are the heartbeat of our democracy and the true architects of our nation’s future.
Let us listen, support, and empower them. The energy, courage, and…
रितेश व जिनिलीया यांच्यासह देशभरातील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी या आंदोलनला पाठिंबा दिला आहे. अनेकांनी सोशल मीडियामार्फत पोस्ट शेअर करत त्यांचं कौतुक केलंय, त्यांना पाठिंबा दिलाय तर काही जण थेट आंदोलन स्थळी पोहचून पाठिंबा देत आहेत. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज, शबाना आझमी, अतुल कुलकर्णी अशा अनेकांचा समावेश आहे. सेलिब्रिटींसह काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनेसुद्धा सहभागी झाले आहेत. समैय रैना, भुवन बाम अशा अनेकांनी सोशल मीडियामार्फत तरुणांच्या मागण्या, त्यांचा आवाज महत्त्वाचा असून त्यांना पाठिंबा दिल आहे असं म्हटलं आहे.
