Riteish Deshmukh On Ravi Jadhav & Nagraj Manjule : गेल्या अनेक दिवसांपासून एका चित्रपटाची चर्चा आहे, तो चित्रपट म्हणजे रितेश देसमुख लिखित आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट. येत्या १ मे पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘राजा शिवाजी चित्रपटात स्वत: रितेशनेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. मात्र, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पहिल्यांदा पाहिलं ते लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांनी.

रितेश देशमुखबरोबर दिग्दर्शक रवी जाधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट करणार होते. पण पुढे रवी जाधव यातून बाहेर पडले आणि अखेर आता रितेश हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका जुन्या मुलाखतीत रवी जाधव यांनी याबद्दल खुलासा केला होता. अशातच आता यावर रितेशनेही प्रतिक्रिया दिली आहे.

“नियतीलाच तेव्हा हा चित्रपट व्हावा असं वाटत नव्हतं” : रितेश देशमुख

News18 Marathi ला दिलेल्या मुलाखतीत रितेश म्हणाला, “१० वर्षांपूर्वी एक गोष्ट घेऊन पुढे गेलो होतो. काही गोष्टींसाठी योग यावा लागतो. १० वर्षात मी अनेकदा दाढी वाढवून तयार झालो होतो. पण तेव्हा काही कारणास्तव ते होत नव्हतं. मला कुठे तरी वाटलं हे जुळून येत नाहीय, बहुतेक नियतीलाच तेव्हा हा चित्रपट व्हावा असं वाटत नव्हतं. आता १ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. खरं म्हणजे सर्वांचं आशीर्वाद आणि प्रेम आहे.”

“राजा शिवाजी चित्रपटावेळी दोघांना फोन करून…” : रितेश देशमुख

यानंतर रितेश म्हणाला, “दहा वर्षांपूर्वी रवी जाधव यांच्याबरोबर ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची सुरुवात केली होती. पण पुढे ते जमलं नाही. त्यावेळेस तो चित्रपट वेगळ्या पद्धतीने झाला असता. त्यानंतर नागराज मंजुळेंबरोबर चित्रपट करणार होतो. पण २०१९ मध्ये लॉकडाऊन लागला आणि ते पुढे जाऊ शकलं नाही. या दोघांचे नाव मी घेतोय कारण हा चित्रपट होण्यामागे या दोघांच्याही शुभेच्छा आहेत. हा चित्रपट आता मी करत असलो तरी त्यांचं नाव घेणार नाही असं होणार नाही. हा चित्रपट लिहायचा विचार केला तेव्हाच दोघांनाही फोन करून सांगितलं होतं आणि तेव्हा त्यांनी मोठ्या मनाने शुभेच्छा दिल्या होत्या.”

दरम्यान, ‘राजा शिवाजी’बद्दल सांगायचे झाले तर, या चित्रपटात रितेशबरोबरच संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलीया देशमुख यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मराठीसह हिंदी व तेलुगू भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.