Actor Riteish Deshmukh speaks out against the Nasrapur incident : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण राज्य हादरले आहे. एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा जीव घेतला. या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला असून मनोरंजनविश्वातील कलाकारांनीही दुःख व्यक्त केलं आहे. या पार्श्वभूमीवर रितेश देशमुकनेही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रितेश देशमुख जो सध्या त्याच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे त्याने पुण्यात घडलेल्या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेबद्दल प्रतिक्रिया देत लवकरात लवकर सरकारने यावर योग्य ती कारवाई करावी असं म्हटलं आहे. रितेशने यावेळी कायद्यानुसार निर्णय घ्यावे लागतात असंही म्हटलं आहे.
रितेश देशमुखने व्यक्त केला संताप
माध्यमांशी संवाद साधताना रितेश म्हणाला, “आपल्या राज्यात किंवा देशात अशा गोष्टी घडतात तेव्हा त्याचा खूप राग येतो की आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त अशी आशा करू शकतो की पोलिसांनी, सरकारने किंवा कोर्टाने लवकरात लवकर तपास करुन कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे आणि अशी रोखठोक कारवाई केली की त्याचा दरारा, दबदबा आणि भीती अशी कृती करणाऱ्यांमध्ये निर्माण होते. “
कायद्यानुसार निर्णय घ्यावे लागतात – रितेश देशमुख
रितेश पुढे म्हणाला, “अशा गोष्टी घडतात तेव्हा आपल्याला वाईट वाटतंच, धक्का बसतो त्यामुळे क्रोध आक्रोश व्यक्त करणं साहजिकच आहे. त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्ट, तातडीने निर्णय घेतले गेले तर याचा दबदबा निर्माण होईल.” रितेशला पुढे अशा व्यक्तींचा चौरंग केला पाहिजा का असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “त्या काळात निर्णय तसे घेतले जात होते, पण तो काळ वेगळा होता. हा काळ वेगळा आहे हेसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आपले नियम वेगळे आहेत, आपलं संविधान आहे. आपल्या नियमांनुसार जे काही करायचं असतं ते करावं लागतं. माझं म्हणणं हे आहे की आपल्याकडे नियम आहेत, कोर्ट आहे त्यामुळे जितक्या लवकरात लवकर निर्णय घेतले जातील तितकं बरं होईल.”
दरम्यान, रितेश देशमुखप्रमाणे मराठी इंडस्ट्रीतील इतर कलाकारांनीसुद्धा याबद्दल संताप व्यक्त केला आहे. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे, शरद पोंक्षे, अक्षय केळकर, कश्मिरा कुलकर्णी अशा अनेकांनी या प्रकरणाबद्दल दु:ख व्यक्त करत लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
