रितेश देशमुखने शेअर केला त्याच्या मुलाचा पहिला फोटो

छोट्या पडद्यावरही रितेश देशमुखचे दणक्यात पदार्पण

छाया सौजन्य- ट्विटर

बॉलिवूडमधला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन त्याच्या लहान मुलाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसह त्याने सुरेख असे कॅप्शनही लिहिले आहे. ‘हा खास दिवस आहे. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि या खास दिवशी मला काहीतरी खास शेअर करायचे आहे’, असे म्हणत रितेशने #राहिल असे लिहिले आहे. तसेच त्याने आईला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांना याआधीही एक मुलगा आहे. रिआन या त्यांच्या मोठ्या मुलासह रितेशचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड गाजले होते. त्यामुळे रितेशच्या या धाकट्या चिरंजीवाचा सोशल मीडियावरचा हा पहिला फोटो अनेकांच्याच पसंतीस उतरत आहे.

‘बॅन्जो’ या चित्रपटातून झळकल्यानंतर रितेश लवकरच छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाव करण्याची अनोखी स्पर्धा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्यांना सेलिब्रेटी बनवणारा गेमशो म्हणून ‘विकता का उत्तर’ ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडून रितेश देशमुख दणक्यात छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. छोट्या पडद्यावरील पदार्पणाबाबत आणि गेम शो बाबत रितेश देशमुख म्हणाला की,’ छोट्या पडद्यावर पदार्पण करणं माझ्यासाठी आनंददायी आहे. तसंच हे पदार्पण स्टार प्रवाहवरून होणं माझ्यासाठी खास आहे. हा खेळ नक्कीच वेगळा आहे. त्या बरोबरच मला महाराष्ट्रातल्या सर्व सामान्यांशी संवाद साधता येणार आहे, त्यांच्या भावभावना जाणून घेता येणार आहे ही आनंदाची बाब आहे. एकूणच, छोट्या पडद्यावर येण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Riteish deshmukh shares son rahyls first picture for fans