सुप्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांनी आज अखेरचा श्वास घेतला. सुप्रसिद्ध विनोदी कलाकार अशी त्यांची ओळख होती. आतापर्यंत त्यांनी अनेक कॉमेडी शोज केले आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका स्टेज शोसाठी ते ४ ते ५ लाख रुपये मानधन घ्यायचे. त्याचबरोबरीने सुत्रसंचालन, जाहिराती तसेच चित्रपटांमध्येही ते काम करत होते. एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार राजू श्रीवास्तव यांची एकूण संपत्ती २० कोटी रुपये इतपत आहे. शिवाय त्यांचं स्वतःचं अलिशान घरदेखील आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच कानपूर येथे सुंदर घरदेखील बांधलं होतं.

हेही वाचा : “मी त्याच्याशी असहमत…” स्वरा भास्करने केले अक्षय कुमारबद्दल मोठे वक्तव्य

त्यांच्या संपत्तीची माहिती मिळवून काही वर्षांपूर्वी अज्ञात चोरांनी त्यांच्या घरात शिरकाव केला होता. ही बातमी वाऱ्यासारखी लोकांमध्ये पसरली होती. त्यावेळी त्यांच्या मुलीने चोरांना पळवून लावले होते. राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा श्रीवास्तव तिच्या शौर्यासाठी प्रसिद्ध आहे. अंतराला माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००७ सालची ही गोष्ट.

३० मे २००७ रोजी राजू श्रीवास्तव यांच्या ओशिवरा येथील घरात चोरट्यांनी प्रवेश केला होता. ड्रेस डिझाईनर आहोत असे ३ जणांनी राजू श्रीवास्तव यांच्या सुरक्षारक्षकाला सांगितले. त्याचा त्यांच्यावर विश्वास बसावा यासाठी ड्रेस डिझाईनर बनून आलेल्या चोरांनी त्या सुरक्षारक्षकाला कपड्यांचे काही डिझाईन्सही दाखले. ते पाहून सुरक्षारक्षकाने राजू  श्रीवास्तव यांच्या पत्नीची परवानगी घेऊन त्यांना राजू यांच्या घरी जाण्याची परवानगी दिली. त्यावेळी राजू श्रीवास्तव काही कामानिमित्त परदेशी दौऱ्यावर होते.

राजू यांच्या घरी गेल्यावर शिखा श्रीवास्तव यांनाही चोरांनी तीच कहाणी ऐकवली. काही कामानिमित्त शिखा काही क्षणासाठी स्वयंपाकघरात गेल्या आणि परत येताच चोरांनी चाकू आणि बंदुकीचा शिखा यांना धाक दाखवला. ते पाहून शिखा घाबरल्या आणि जोरात किंचाळल्या. त्यांचा आवाज ऐकून बेडरूममध्ये असलेली त्यांची मुलगी अंतरा सावध झाली. तिने खोलीचे दार आतून लाऊन घेत जोरात हाका मारत बिल्डिंगमधील लोकांना मदतीला बोलावले.

आणखी वाचा : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्ली येथे होणार अंत्यसंस्कार

अंतरा हिने आपली बुद्धिमत्ता आणि धैर्य दाखवून चोरट्यांना तुरुंगात पाठवले. अंतराने तिची आई शिखा श्रीवास्तव यांचे प्राण या चोरांपासून वाचवले. तिने दाखवलेल्या शौर्याबद्दल तिला माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.