scorecardresearch

.. हा ‘बॅटमॅन’ तरी टिकेल का?

‘आयर्नमॅन’च्या खांद्यावर बसून माव्‍‌र्हलने यशाचा डोंगर सर केला, तसाच काहीसा प्रयत्न बॅटमॅनच्या बाबतीत झाला.

‘बॅटमॅन’ हा डीसीचा आजवरचा सर्वात यशस्वी सुपरहिरो आहे. १९३९ साली आलेल्या या व्यक्तिरेखेने जवळपास ९० वर्षांहून अधिक काळ चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. त्यामुळे अभिनेता बेन अफ्लेकच्या निवृत्तीनंतर ‘बॅटमॅन’ या व्यक्तिरेखेची धुरा कोण सांभाळणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. परंतु डीसीने एका नवीन ‘बॅटमॅन’ची घोषणा करून या उत्सुकतेला पूर्णविराम दिला आहे. ३३ वर्षीय अभिनेता रॉबर्ट पॅटिंसन याची बॅटमॅनच्या भूमिकेसाठी नेमणूक करण्यात आली आहे.

सुपरहिरो तयार करणाऱ्या ‘माव्‍‌र्हल’ व ‘डीसी’ या दोन कारखान्यांमध्ये गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ चुरशीची स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही कंपन्यांचा चाहतावर्ग जवळपास सारखाच आहे, परंतु गेल्या १० वर्षांत माव्‍‌र्हलने उभारलेल्या ‘अ‍ॅव्हेंजर्स’ या संकल्पनेने कमाल केली. परिणामी ते डीसीच्या तुलनेत जवळपास १० पावलं पुढे गेले आहेत. डीसीनेही ‘जस्टिस लीग’ या संकल्पनेत पैसे गुंतवून आपल्या प्रतिस्पध्र्याना टक्कर देण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु कमकुवत पटकथा, गोंधळलेले दिग्दर्शन व चित्रपटांच्या चुकीच्या क्रमवारीमुळे त्यांना अपेक्षित यश संपादित करता आले नाही. या संपूर्ण अपयशाचे खापर तत्कालीन बॅटमॅन अभिनेता बेन अफ्लेकवर फोडण्यात आले. परिणामी नाराज बेनने डीसी युनिव्हर्स सोडण्याचा निर्णय घेतला. याआधी असाच काहीसा प्रकार आजवरचा सर्वात यशस्वी बॅटमॅन डार्क नाइट फेम क्रिश्चन बॅलेच्या बाबतीतही घडला होता. आणि त्यालाही जबरदस्तीने निवृत्ती स्वीकारावी लागली होती.

‘आयर्नमॅन’च्या खांद्यावर बसून माव्‍‌र्हलने यशाचा डोंगर सर केला, तसाच काहीसा प्रयत्न बॅटमॅनच्या बाबतीत झाला. त्यामुळे डीसी युनिव्हर्सने गेल्या १० वर्षांत केलेला कारभार पाहता त्यांचे संपूर्ण गणित बॅटमॅनच्या यशावर अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. क्रिश्चन बॅले व बेन अफ्लेक या दोघांनाही हॉलीवूड सिनेसृष्टीतील अत्यंत नावाजलेले कलाकार म्हणून ओळखले जाते. परंतु चाहत्यांचा अतिरिक्त दबाव व डीसी कंपनीतील अंतर्गत मतभेदांमुळे या दोघांनाही बॅटमॅन ही व्यक्तिरेखा दीर्घकाळ साकारता आली नाही. या पाश्र्वभूमीवर विचार करता दोन मोठय़ा अभिनेत्यांच्या बदलीवर आलेला रॉबर्ट पॅटिंसन काय करिश्मा करतो हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Robert pattinson batman mpg

ताज्या बातम्या