लॉकडाउनमुळे देशातील अनेक व्यवहार ठप्प आहेत. सर्वजण घरात अडकून पडले आहेत. पण, स्वतःसाठी वेळ देता येणं, छंद जोपासण्याची संधी मिळणं या लॉकडाउनच्या सकारात्मक बाबी आहेत. आपल्या मनोरंजनासाठी, एरव्ही रात्रंदिवस झटणारे कलाकारसुद्धा याला अपवाद नाहीत. छंद जोपासण्याची, स्वतःच्या मनोरंजनाकरिता वेळ घालवण्याची संधी त्यांना मिळाली आहे. ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या, अभिनेत्री रोहिणी हट्टंगड सुद्धा, हा ब्रेक एन्जॉय करत आहेत.

साताऱ्यातील घरी, त्यांच्या आवडत्या गोष्टी करण्यात रोहिणी व्यस्त आहेत. स्वयंपाक करण्यात त्यांचा वेळ छान जात आहे. त्या नियमितपणे स्वतः घराची साफसफाई करत आहेत. या सगळ्यातून वेळ काढून मांजरीशी खेळणे हा त्यांच्या दिनक्रमातील महत्त्वाचा भाग आहे. स्क्रिप्टचे वाचन, वेब सीरिज बघणे यासाठी रोहिणी हट्टंगडी रात्रीचा वेळ मोकळा ठेवतात. चित्रीकरणाच्यावेळी स्वतःला कामात झोकून देण्यात त्या नेहमीच पुढे असतात. शूटिंगमधील धम्माल, मजामस्ती यात आनंदाने त्या सहभागी होतात. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात, सेटवरील माहौलची त्यांना फार आठवण येत आहे. मात्र दुसरीकडे स्वतःसाठी मिळालेला हा मोकळा वेळ त्यांच्यासाठी सुद्धा एक सुवर्णसंधी ठरली आहे. व्यस्त दिनक्रमामुळे करता येत नसलेल्या अनेक आवडीच्या गोष्टी करण्यामध्ये रोहिणी हट्टंगडी त्यांचा वेळ घालवत आहेत.

आणखी वाचा : ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील आसावरी खऱ्या आयुष्यातही आहे सुगरण

त्यांच्या या दिनक्रमाविषयी बोलताना त्या सांगतात; “मी शूटिंग मिस करतेय, ही गोष्ट खरी आहे. पण, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी लॉकडाऊनमुळे मिळाली आहे. घरासमोरच्या अंगणात फेरफटका मारणे, कॉफीचा कप हातात घेऊन निवांतपणे तिचा आस्वाद घेत बसायचं, या गोष्टी करायला मोकळा वेळ मिळाला आहे. अनेक वर्षांत करायला न मिळालेल्या सगळ्या गोष्टी या लॉकडाउनच्या काळात मी पुन्हा अनुभवत आहे.”