महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सवाची सुरुवात हॉलीवूडच्या ग्लॅमरला साजेशा दिमाखदार रेड कार्पेट सोहळ्याने झाली. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज तारे-तारकांच्या उपस्थितीने सॅन होजेतील वातावरण मराठमोळ्या उत्साहाने भारून गेले. या सोहळ्यात हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यरंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना त्यांच्या देदीप्यमान कलाप्रवासाबद्दल मानाचा ‘नाफा जीवन गौरव’ प्रदान करण्यात आला. नाफाचे संस्थापक-अध्यक्ष अभिजित घोलप यांच्या हस्ते हा सन्मान बहाल करण्यात आला. यावेळी नाफाच्या को-कन्व्हेनर अर्चना सराफ, रिया ठोसर, ज्येष्ठ सभासद ठाणेदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘मला अजून खूप काम करायचे आहे. ‘जीवन गौरव’ मिळाल्यानंतर घरी बसण्याचा माझा अजिबात विचार नाही. भारताबाहेर मिळालेला हा माझा पहिलाच पुरस्कार असल्याने हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत विशेष आणि भावनिक आहे’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत रोहिणी हट्टंगडी यांनी हा सन्मान आपल्या संपूर्ण कलाप्रवासाला आकार देणाऱ्या आई-वडिलांसह गुरू इब्राहिम अल्काझी, पती जयदेव हट्टंगडी, सहकलाकार, दिग्दर्शक, लेखक, कलावंत आणि निर्माते यांना समर्पित केला.

‘नाफा हा केवळ रुपेरी पडद्याशी जोडलेला चित्रपट महोत्सव नसून अमेरिकेच्या भूमीत मराठी भाषा, संस्कृती, कला आणि परंपरेचा जागर घडविणारे सांस्कृतिक व्यासपीठ आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यामुळे यंदापासून या उपक्रमाला अधिक बळ मिळाले आहे. यापूर्वीचा नाफा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते दिलीप प्रभावळकर व अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांना देण्यात आला. आज त्याच प्रभावळीतील रोहिणीताई हट्टंगडींचा सन्मान करण्याची संधी मिळणे हा नाफासाठी अभिमानाचा क्षण असून, त्यांच्या सहवासाने नाफाचे व्यासपीठ अधिक समृद्ध होत आहे’ असे अभिजित घोलप यांनी सांगितले.

यंदा नाफा सोहळ्याला महेश कोठारे, अतुल कुलकर्णी, अजिंक्य देव, गिरीजा ओक, श्रुती मराठे, अर्चना जोगळेकर, नागराज मंजुळे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि निर्माती गार्गी कुलकर्णी यासारख्या मराठीतील नामवंत कलाकार उपस्थित होते. सॅन होजे येथील कॅलिफोर्निया थिएटरमध्ये तीन दिवस रंगणाऱ्या ‘नाफा महोत्सवा’च्या पुढील दोन दिवसांत विविध चर्चासत्रे, मार्गदर्शनपर व मनोरंजक कार्यक्रमांसह अनेक चित्रपट आणि लघुपटांचे वर्ल्ड प्रीमिअर व विशेष शो प्रदर्शित होणार आहेत.