Ruby Bhatia Life Coach Journey: ९० च्या दशकात ‘बीपीएल ओये’ आणि अनेक मोठ्या पुरस्कार सोहळ्यांची शान असलेली रुबी भाटिया (Ruby Bhatia) आज ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर आहे. मिस इंडिया कॅनडा राहिलेली रुबी आता एक ‘लाइफ कोच’ म्हणून काम करत असून तिने तिच्या मानधनाबाबत मोठा खुलासा केला आहे. विशीत असताना एका शोसाठी १ लाख रुपये घेणारी रुबी आता दिवसाला केवळ १ ते २ हजार रुपयांसाठी ऑनलाइन सेशन्स घेते. “मला पुन्हा मेकअप आणि पार्ट्यांच्या चक्रात अडकायचे नाही, मला माझ्या मुलांकडे लक्ष द्यायचे आहे,” असे म्हणत तिने करिअरपेक्षा कुटुंबाला प्राधान्य दिल्याचे सांगितले.

मी आजही लाखो रुपये कमवू शकते – रुबी भाटिया

‘व्हेरी इंटरेस्टिंग’ पॉडकास्टमध्ये या बदलाबाबत रुबी म्हणाली, “माझ्या विशीत मी एका शोसाठी १ लाख रुपये कमवायचे. आज माझ्या काळातील इतर कलाकार शो होस्ट करण्यासाठी २ ते ३ लाख रुपये घेतात. माझं ते आयुष्य मी तरुण आणि अविवाहित असतानाचं होतं. जर मी आजही त्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं, तर मी पुन्हा लाखो रुपये कमवू शकेन. पण मग मला माझ्या मुलांकडे लक्ष देता येणार नाही किंवा घर सांभाळता येणार नाही. मग फक्त मी आणि माझे काम एवढंच उरेल. मला पुन्हा त्याच मेकअप, शो, मंदिर, स्पा, पार्ट्या आणि इंडस्ट्रीत वावरणं या चक्रात अडकावे लागेल. हे सर्व करून मी पुन्हा लाखो रुपये कमवू शकेन.”

रुबीने पुढे सांगितलं की, आता तिला त्या जुन्या आयुष्याशी स्वतःला जुळवून घेता येत नाहीये. बदललेली जीवनशैली, वाढते वय आणि कोरोना महामारीच्या काळात आलेला मानसिक ताण यामुळे ती बदलली आहे. ती म्हणाली, “गोष्टी आता पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. मी आता ती जुनी रुबी राहिलेली नाही. पूर्वी माझ्याकडे जी चपळता आणि तल्लखपणा होता, तो आता राहिलेला नाही.”

“मी आता इतके कमी मानधन का घेते, कारण…”

लाइफ कोच बनण्याचा निर्णय का घेतला, याबद्दल रुबी म्हणाली, “एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते. मला ५०० लोकांसाठी माझी ऊर्जा खर्च करावी लागते. शेवटी सर्व काही ऊर्जेवर अवलंबून असतं आणि मला असं वाटलंय की माझी ऊर्जा पूर्णपणे संपली आहे. मी घरी परतल्यावर खूप चिडचिड करायचे, पण घरातही माझ्या काही जबाबदाऱ्या होत्या. आता मी ५२ वर्षांची आहे आणि माझ्या उरलेल्या आयुष्यात मला काहीतरी अर्थपूर्ण काम करायचं आहे. मी गेल्या २५ वर्षांपासून महिलांसाठी लाइफ कोचिंग करत आहे, अनेकदा तर मी त्यासाठी पैसेही घेतले नाहीत.”

महिन्याला कमावते एक लाख रुपये

रुबी पुढे म्हणाली, “मी आता खूप कमी पैसे घेते कारण जर मी १ लाख रुपये मानधन मागितलं, तर कोणीही येणार नाही. मी सुरुवातीच्या एक महिन्याच्या प्रोग्रामसाठी १,००० रुपये, सहा महिन्यांसाठी ३,००० रुपये आणि वर्षासाठी ५,००० रुपये अशी फी ठेवली आहे. जर मला दिवसातून १,००० रुपयांचे दोन-तीन क्लायंट्स मिळाले, तर ते माझ्यासाठी पुरेसे आहे; त्यातून महिन्याला जवळपास १ लाख रुपये मिळतात.”

दैनंदिन खर्चाबद्दल रुबी म्हणाली, “जर मला छोट्या ऑनलाइन सेशन्सच्या माध्यमातून दिवसाला १,००० ते २,००० रुपये मिळाले, तर त्यातून माझा रोजचा खर्च निघतो. देवाच्या कृपेने आमच्याकडे आधीच प्रॉपर्टी, फिक्स्ड डिपॉझिट्स, घर आणि गाडी आहेच. हे पैसे फक्त अतिरिक्त गरजा आणि खर्चासाठी आहेत.”

इंटरनेटमुळे शालेय शिक्षण पद्धती कालबाह्य झाली – रुबी भाटिया

रुबीने शिक्षणाबद्दलची तिची मतं मांडली आणि ती आपल्या मुलांना शाळेत का पाठवत नाही, याचं कारण सांगितले. “मला वाटतं की सध्याची शालेय पद्धती मुलांसाठी योग्य नाही. आता सर्व काही चॅटजीपीटीवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला ग्रहांची संख्या जाणून घ्यायची असेल, तर ती माहिती एका क्लिकवर मिळते. इंटरनेटमुळे शाळेतील अनेक गोष्टी आता अनावश्यक झाल्या आहेत. आपल्याला आता इतिहास, भूगोल किंवा अगदी गणिताचीही फारशी गरज उरलेली नाही, कारण कॅल्क्युलेटरवर सर्व काही उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त १० च्या पाढ्यासारख्या मूलभूत गणिताची गरज आहे. आयुष्य अनमोल आहे, मग आपण ते अशा प्रकारे का वाया घालवत आहोत?”